🌟दोघांची सखोल चौकशी करण्याची आमदार सौ.मेघनाताई बोर्डीकर यांची पत्रकार परिषदेतून मागणी🌟
परभणी (दि.१२ डिसेंबर २०२४) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमानासह दुसर्या दिवशी घडलेल्या हिंसाचाराला सकल हिंदू समाज जबाबदार असल्याचं परभणी लोकसभेचे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यसभेतील खासदार श्रीमती फौजिया खान यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्देवी आणि जातीय तेढ निर्माण करणारे आहे त्यामुळे त्या दोन्ही खासदारांची सखोल चौकशी करीत तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज गुरूवार दि.१२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केली.
बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मानवी हक्क दिनी दि.१० डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण परभणी जिल्हाभरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार मोर्चे काढण्यात आले हे मुक मोर्चे अत्यंत शांततेत व सुरळीतपणे पार पडले कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही परभणीतील मोर्चाचा समारोप दुपारी १२.३० वाजता झाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमानाची दुर्देवी घटना सायंकाळी घडली ते कृत्य करणार्या आरोपीला प्रत्यक्षदर्शनींनी ताब्यात घेतले पोलिसांनी लगेच अटकही केली. या घटनेनंतर जमावाने रोष व्यक्त केल्यानंतर व्यापार्यांनीही समाजबांधवांच्या भावना ओळखून बाजारपेठा बंद केल्या. बुधवारी म्हणजे दुसर्या दिवशी पुकारलेल्या बंदलाही व्यापार्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळपासून बंद शांततेत बंद सुरू होता. मात्र दुपारनंतर काही समाजकंटकांनी जाणिवपूर्वक दगडफेक, जाळपोळ करून हिंसाचार घडवला, असे आमदार साकोरे यांनी नमूद केले.
हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, असे स्पष्ट करतेवेळी आमदार साकोरे यांनी खासदार जाधव आणि राज्यसभा सदस्या श्रीमती खान यांनी या घटनेबाबत जाणिवपूर्वक, हेतुतः या दोन्ही घटनांसंदर्भात केलेले वक्तव्य हे निश्चितच निषेधार्ह आहे. जातीय तेढ वाढविणारे आहे, असा आरोप केला. सकल हिंदु समाजाचा मोर्चा यशस्वी झाल्याचे या दोघांना कदाचित देखवले नाही, म्हणूनच त्यांनी याकडे बोट दाखवल्याचा आरोपही आ. साकोरे यांनी केला.
संवैधानिक पदावरील व्यक्तींनी दिल्लीत बसून असे वक्तव्य करणे चुकीचे असून या दोघांनी तात्काळ माफी मागावी. प्रशासनाने चौकशी करीत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही केली. त्यांचे वक्तव्य पाहता काही मंडळींनी जाणिवपूर्वक तर हा प्रकार घडवलेला नाही ना? अशी शंकाही आमदार साकोरे यांनी व्यक्त केली. जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून महाराष्ट्र अशांत करण्याचा अशा मंडळींचा डाव असू शकतो. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी आणि संविधान प्रतिकृतीचा अवमान करण्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे? याचाही शोध घ्यावा, अशी मागणी आमदार साकोरे यांनी केली.
दरम्यान, याप्रसंगी डॉ. केदार खटींग, भाजपा महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, मंगल मुदगलकर, आनंद बनसोडे, बाळासाहेब भालेराव आदी उपस्थित होते......
0 टिप्पण्या