🌟कोटगिरे अपहरण प्रकरणातील आरोपींचा पोलिस प्रशासनाने चौवीस तासांच्या आत लावला यशस्वीरित्या शोध🌟
नांदेड (दि.१४ डिसेंबर २०२४) - नांदेड येथील शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहरप्रमुख गौरव कोटगिरे अपहरण प्रकरणी पोलिस प्रशासनाने जलद गतीने तपासाची चक्र फिरवून या अपहरण प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन तसेच खंजर जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी आज शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
नांदेड शहर शिवसेना उबाठा पक्षाचे शहरप्रमुख गौरव कोटगिरे हे काल शुक्रवार दि.१३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९.०० वाजेच्या सुमारास शहरातील बाफना टी पॉईंट येथील लकी वेल्डींग ॲण्ड वर्कर्स या गॅरेजमध्ये चारचाकी वाहनाचे काम करण्यासाठी थांबले होते यावेळी एका वाहनातून पाच ते सहा जण उतरले आणि खंजरचा धाक दाखवून गौरव कोटगिरे यांना आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले दरम्यान गॅरेजवर असलेल्या त्यांच्या ड्रायव्हरने या घटनेबाबत नातेवाईकांना माहिती दिली नातेवाईकांनी तात्काळ इतवारा पोलीस ठाणे गाठले शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचं अपहरण झाल्याची बातमी संपूर्ण नांदेड शहरासह जिल्ह्यात पसरताच एकच खळबळ उडाली सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड जिल्हा पोलिस दलाने तात्काळ सर्वत्र नाकाबंदी सुरु केली शोध मोहीम सुरु असताना चंदासिंग कॉर्नर येथे गौरव कोटगिरे हे आढळून आले.
पोलीसांनी कोटगिरे यांच्याशी घडलेल्या घटने संबंधी सविस्तर माहिती जाणुन घेतली. याप्रकरणी अज्ञात पाच ते सहा जणाविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रस्त्यावरील सीसीटीव्हीचे फुटेजही तपासण्यात आले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय,फौजदार मिलिंद सोनकांबळे व पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन अपहरणाच्या घटनेतील आरोपी हे मारतळा भागात असल्याची माहिती मिळाली.
यावेळी इतवारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायर यांच्या नेतृत्वाखाली पो.नि.उदय खंडेराय, इतवारा पोलीस स्टेशनचे पो.नि. रंजीत भोईटे, फौजदार आनंद बिच्छेवार, फौजदार मिलिंद सोनकांबळे, फौजदार रमेश गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी मारतळा भागात जावून बालाजी शिवाजी जाधव (वय २९),धंदा व्यापार, रा.दयासागरनगर, तरोडा (खु.),नांदेड, दिलीपसिंग हरिसिंग पवार (वय ३२), धंदा मजुरी,रा.विस्तारीत नाथनगर, नांदेड,अनिल शिवाजी भगत (वय ३५), धंदा मजुरी,रा.दरवेशनगर हिंगोली नाका, नांदेड,बालाजी किशन भारती (वय ३६), धंदा मजुरी,रा. श्रीरामनगर, हिंगोली नाका,नांदेड,सुनिल ग्यानोबा वाघमारे (वय ३४), धंदा मजुरी,रा.नाईकनगर,नांदेड,अमनदीप अवतारसिंग राठोड (वय २४), धंदा बेकार,रा.मगनपूरा,नांदेड, चैतन्य संजय जोंधळे (वय १९),धंदा बेकार, रा. विष्णुपुरी, नांदेड यांच्यासह एका विधिसंघर्ष बालकास पोलीसांनी अटक केली त्यांच्याकडून अपहरणासाठी वापरण्यात आलेली टाटा सफारी,खंजर पोलीसांनी जप्त केले आहे.बालाजी शिवाजी जाधव व गौरव कोटगिरे यांचे यापूर्वी वाहन खरेदी-विक्री करणे व फायनान्सचा व्यवहार होता या व्यवसायातील आर्थिक वादातूनच गौरव कोटगिरे यांचे अपहरण केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले अटक केलेल्या आरोपींपैकी काही जणांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव,पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायर,पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.....
0 टिप्पण्या