🌟फौजिया खान यांनी काल गुरुवार दि.०५ डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे मागितली स्पष्टता🌟
परभणी : देशभरातील शाळांमध्ये सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जात आहे,किती राज्यांनी या तत्त्वांना प्रतिसाद दिला आहे आणि ही नियमावली कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करण्याचा सरकारचा विचार आहे का,याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या तथा राज्यसभेच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी काल गुरुवार दि.०५ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे स्पष्टता मागितली.
खासदार डॉ.फौजिया खान यांनी शाळांमध्ये वारंवार समोर येणार्या समस्या उघड केल्या ज्यामध्ये अपुरे पायाभूत सुविधा, निष्काळजीपणा, मुलांमधील भेदभाव, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांचा अभाव आणि नियमित सुरक्षा तपासणीची अनुपस्थिती यांचा समावेश आहे. शाळांमध्ये जबाबदारी व पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी तृतीयपक्षीय सुरक्षा तपासणींचा समावेश करण्याची मागणीही केली.
यावर उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व शाळांसाठी सुरक्षा आणि संरक्षणाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी देखरेखीची प्रभावी यंत्रणा अस्तित्वात आहे. आतापर्यंत २१ राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारल्याची माहिती दिली असून, स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल केले आहेत. ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित १६ व्या संयुक्त देखरेख समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर विस्तृत चर्चा झाली, असे ते म्हणाले.
सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करताना डॉ. खान यांनी या मार्गदर्शक तत्त्वांना कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करण्याची मागणी पुन्हा अधोरेखित केली. मुलांच्या भवितव्यासाठी शाळांची सुरक्षा आणि सर्वसमावेशकता सर्वोच्च प्राधान्याने हाताळली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली......
0 टिप्पण्या