🌟सिख धर्माचे सर्व अनुयायी दिनांक 21 डिसेबर ते 28 डिसेंबर दरम्यान "बलिदान सप्ताह" पाळतात🌟
✍️प्रासंगिक - लघु लेख : स.रविंदरसिंघ मोदी,पत्रकार
भारत भूमीवर अनेक धर्म, जातीं आणी समाज सौहार्द जपत एकदुसऱ्यात मिसळून मार्गक्रमण करीत आहेत. त्यापैकीच एक धर्म सिख (शीख) धर्म होय. सिख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानकदेवजी यांच्या पासून दहावे गुरु श्री गुरु गोबिंदसिंघजी पर्यंत चालत आलेला सिख धर्म हा नेहमी मानवता तत्वाचे पुरस्कार करीत आला होता आणी त्याच तत्वाच्या प्रचाराची आज देखील गरज भासत आहे. भारत भूमिच्या धर्म आणी संस्कृति रक्षणार्थ सिख धर्माने नेहमी योगदान दिलेले आहेत. पाचवे सिख गुरु,श्री गुरु अर्जन देवजी आणी नववे गुरु श्री तेगबहादुर जी यांनी गुरु पदावर असतांना धर्म रक्षणार्थ हौतात्म्य स्वीकारले होते. त्यांचीच प्रेरणा पुढे स्फुरित होऊन श्री गुरु गोबिंदसिंघजी यांचे चार पुत्र (साहबजादें) यांचे अद्वितीय असे बलिदान झाले. असले हे बलिदान भारतीय धर्म आणी संस्कृतिच्या रक्षणासाठी एक प्रेरणा म्हणून देशात स्थापित झाले. सिख धर्माचे सर्व अनुयायी दिनांक 21 डिसेबर ते 28 डिसेंबर दरम्यान "बलिदान सप्ताह" पाळतात. कारण या एका आठवाडाभरात श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचे चार पुत्र आणी आई यांचे बलिदान घडून आले. गुरुजींच्या चार पुत्रांना आदराणे "साहबजादा" असे शब्द संबोधित केले जाते. साहबजादा अजीतसिंघजी (वय 17) आणी साहबजादा जुझारसिंघजी (वय 14) यांनी युद्धात हौतात्म्य पत्करलं. तर साहबजादा जोरावरसिंघजी (वय 9) आणी साहबजादा फतेहसिंघजी (वय 7) यांनी धर्म परावर्तन करण्यास नकार दिल्यामुळे मोघल बादशाह औरंगजेब यांचे सरहिंदचे सूबेदार वजिरखान यांनी दोघांना जीवंतपणी भिंतीत डाबुन शहीद केले. याप्रसंगी डोळ्याने शहीदीचे दृश्य पाहणाऱ्या श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या आई माता गुजरीजी यांनी दुःखाने प्रसंगीच आपले प्राण सोडले. बलिदान सप्ताहाचे असे महान इतिहास आहे. हा सप्ताह पाळत असतांना सिख धर्मीय साधे जीवन जगतात. कोणतेच समारंभ किंवा उत्साहाचे कार्यक्रम करीत नाहीत. विवाह, वाढदिवस, विजय यात्रा सारखे उपक्रम राबवित नाहीत. गुरूद्वारे, प्रतिष्ठान किंवा घरावर रोषणाई करीत नाहीत. घरात गोड पदार्थ तयार करणं किंवा खाणं टाळतात. सप्ताहभर परमेश्वराचे नामस्मरण करण्यात अधिक वेळ घालावतात. भारतात व विश्वात शांतता नांदावी आणी माणुसकी तत्व सुदृढ व्हावे अशी प्रार्थना मनोमनी सर्व करीत असतात. सिख समाजाची ही भावना सर्वत्र प्रसारित व्हावी हीच अपेक्षा.
स.रविंदरसिंघ मोदी,पत्रकार
9420654574
0 टिप्पण्या