🌟वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन🌟
🌟चिंच वाण ‘शिवाई’ यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता🌟
परभणी : उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता,अधिसूचना आणि वाण प्रसाराणासाठीच्या 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या 31व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो वाण पीबीएनटी-20, मिरची वाण पीबीएनसी-17 आणि विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण ‘शिवाई’ यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षपद नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या) प्रा. संजय कुमार सिंह यांनी भूषवले. बैठकीदरम्यान प्रा. सिंह यांनी या नव्या वाणांच्या महत्त्वावर भर दिला व वाणांचे बियाणे उत्पादन साखळीत समाविष्ट करण्याचे शिफारस केली. यामुळे शेतकर्यांना या पिकांच्या उच्च दर्जाच्या बियाण्यांची सहज उपलब्धता होईल व उत्पादनक्षमता वाढवता येईल. या वाणांच्या अधिसूचनेनंतर संबंधित वाण बियाणे प्रमाणन प्रणालीसाठी समाविष्ट केले जातील, असे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या पत्राद्वारे कळविले आहे.
या नवीन वाणांच्या मान्यतेमुळे शेतकर्यांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक वाण मिळून त्यांच्या उत्पादनामध्ये सकारात्मक बदल होतील. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मराठवाडा विभागातील शेतकर्यांसाठी या वाणांच्या विकासामुळे कृषी संशोधनातील महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी करून वाण विकासातील सर्व सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी म्हणाले की, या वाणाच्या राष्ट्रीय मान्यतेमुळे उद्यानविद्या संशोधनास प्रेरणा मिळाली असून भविष्यात नवनवीन वाण विकास करण्यात येतील असे नमूद करून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
या वाणांच्या विकासासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे महत्वपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल शास्त्रज्ञानी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मिरची आणि टोमॅटोच्या वाण विकासामध्ये डॉ विश्वनाथ खंदारे, डॉ आर डी. बगीले, डॉ आनंद दौंडे, डॉ. जी. एम वाघमारे, डॉ. व्ही एस जगताप, डॉ. एस व्ही धुतराज या शास्त्रज्ञांचे आणि चिंचेचा वाणविकासामध्ये डॉ. संजय पाटील, डॉ रवी चव्हाण, डॉ. जी. एम वाघमारे, डॉ मोहन पाटील यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.
विकसित वाणांची प्रमुख वैशिष्ट्ये...
मिरची वाण ‘पीबीएनसी 17’ - हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा 531 ते 546 क्विंटल प्रति हेक्टर, मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस. हा वाण लिफकर्ल व अॅथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशिल आहे. टोमॅटोचा सरळ वाण ‘पिबीएनटी 20’ - हा वाण रबी हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस आहे. या वाणाची उत्पादन क्षमता 614 ते 620 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असुन प्रति फळाचे वजण 60 ते 65 ग्रॅम आहे. लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फळाची पहीली काढणीस येते. हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुल किडे या किडीस मध्यम सहनशिल आहे. चिंचेचा वाण ‘शिवाई’ - या वाणाच्या फळाची लांबी 20.43 सेंटीमीटर, रुंदी 3.13 सेंटीमीटर, फळाची सरासरी वजन 35.33 ग्राम, प्रति किलो गराचे वजन 497.07 ग्राम, एकूण विद्राव्य घटकाचे प्रमाण 41.6 टक्के, फळाची आम्लता 31.2 टक्के आढळून आले आहे. चिंचेतील चिंचोक्याचा आकार मोठा आणि संख्या कमी असल्यामुळे गर जास्त मिळतो. शिवाई वाणाच्या एका झाडापासून फळाचे उत्पादन आठ ते नऊ क्विंटल (प्रति झाड 843.33 किलो) उत्पादन निघते, प्रक्रिया उद्योगात चिंचेला मागणी आहे. चॉकलेट, जेलीसह विविध खाद्यपदार्थात चिंच वापरतात. फटाके उद्योगात चिंचोक्याच्या पावडरला मागणी असते. हा वाण कीड रोधक असून कोरडवाहू भागात उपयुक्त ठरणार आहे........
0 टिप्पण्या