🌟आमदार रोहित पवार यांची मागणी : सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांची आ.रोहित पाटील यांनी घेतली भेट🌟
परभणी : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणारी निषेधार्ह घटना आणि त्यानंतरच्या घटनाक्रमात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाची निष्पक्षपणे न्यायालयीन चौकशी करून जबाबदार पोलीस अधिकार्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आ. पवार यांनी मंगळवारी (दि.17) सकाळी परभणीत येऊन मयत सोमनाथ सुर्यवंशी याच्या आई व भावाची भेट घेतली. तसेच सोमवारी सायंकाळी र्दयविकाराने निधन झालेले आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर संपुर्ण घटनाक्रमाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांकडून माहिती घेऊन जिल्हाधिकार्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर आ.पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे, मराठवाडा शिक्षक सेलचे विभागीय अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, संतोष बोबडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, अजय गव्हाणे, विकास लंगोटे, रमाकांत कुलकर्णी, रितेश काळे, डॉ.अनिल कांबळे, सरचिटणीस गंगाधर यादव, आतिश गरड आदी उपस्थित होते.
संविधान प्रतिकृतीच्या अपमान करणार्या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि या निषेधार्थ लोकशाही मार्गाने बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलन शांततेने सुरू असताना बाहेरून आलेल्या तोंड बांधून धुडगूस घालणार्या मंडळींनी जाळपोळ, दगडफेक करून दंगल घडविल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकार्याना गाफील ठेवून सर्वसामान्य लोकांवर लाठीचार्ज करून कोम्बिग ऑपरेशन केले. बेकायदेशीरपणे दलित वस्त्यांना लक्ष्य करीत अत्याचार करणार्या पोलिसी कार्यपद्धतीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत दुर्देवी मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला मृत्यू आणि 10 डिसेंबरच्या घटनेसह संपूर्ण घटनाक्रमाची न्यायालयीन व निष्पक्ष चौकशी चौकशी करावी, दोषी प्रशासन व पोलीस अधिकार्यांच्या विरोधात कारवाई करावी, सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबास आर्थिक मदत करावी, हिंसाचारातील नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत विजय वाकोडे हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनासोबत राहून प्रयत्न करत असताना हिंसाचार प्रकरणात त्यांना प्रमुख आरोपी करण्यात आल्याच्या प्रकाराबद्दल त्यांनी पोलिस प्रशासनावर टीका केली. महिलांना पुरूष पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोप करत त्या पोलिसांवरही कारवाईचीही मागणी त्यांनी केली. तसेच बीड जिल्ह्यात काही वर्षापुर्वी घडलेली दंगल आणि परभणीतील हिंसाचार प्रकरणात साम्य असल्याचे सांगून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना अटक केली जात नाही आणि परभणीत सर्वसामान्यांना पकडून जेलमध्ये टाकून चुकीच्या पध्दतीने कारवाई होतेय हा विरोधाभास पहायला मिळत आहे, असे ते म्हणाले.....
0 टिप्पण्या