🌟परभणी शहरातील डॉक्टर लाईन परिसरातील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थागुशाने लावला बारा तासात....!


🌟स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना घेतले ताब्यात : मोबाईल हँडसेटसह लुटलेल्या रक्कमेतील तेराशे रुपये जप्त🌟 

परभणी (दि.२६ डिसेंबर २०२४) : परभणी शहरातील डॉक्टर लाईन परिसरात ऑटोतून प्रवास करणार्‍या सहप्रवाशास धाक दाखवून रोख ४३ हजार रुपयांसह त्यांच्याकडील एक विवो कंपनीचा मोबाईल लंपास करणार्‍या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या १२ तासात जेरबंद करण्याची धाडसी कारवाई केली.

            या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील कृष्णा नंदकुमार भोसले हे गृहस्थ २४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९.१५ वाजेच्या सुमारास डॉक्टरलेन भागातील एका रुग्णालयात नातेवाईकास भेटण्याकरीता ऑटोत बसले होते त्यावेळी ऑटोतील दोघा अनोळखी व्यक्तींनी धाक दाखवून त्यांच्याकडील नगदी ४३ हजार रुपयांसह त्यांचा विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट लंपास केल्याची घटना घडली या घटने प्रकरणी नवा मोंढा पोलिस स्थानकात भोसले यांनी फिर्याद दाखल केल्याबरोबर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी व अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना तपासाच्या सूचना दिल्या. 

यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास एका खबर्‍याकडून गंगाखेड रस्त्यावरील विकास नगरातील हर्जीतसिंग विक्रमसिंग जून्नी व त्याचे साथीदार यांनी तो गुन्हा केल्याची माहिती कळाली. तेव्हा या पथकाने तात्काळ त्यास ताब्यात घेवून त्याचे साथीदार बालाजी उर्फ मुगदाड बाळ्या पिता नामदेव साळवे (रा. अण्णाभाऊ साठे नगर, उड्डाणपूलाजवळ) यास ताब्यात घेतले. या दोघांकडून चोरलेल्या पैशांपैकी नगदी १३०० रुपये व विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जप्त केला. मोंढा पोलिस ठाण्यात या गुन्हेगारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील मुद्देमाल जप्त करण्याकरीता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

              या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, आर.एस. मुत्तेपोड, पोलिस उपनिरीक्षक अजित बिरादार, अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, रवि जाधव, शेख रफियोद्दीन, निरज परसोडे यांचा सहभाग होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या