🌟अमरावतीची करीना थापा शौर्यासाठी व मुंबईच्या केया हटकर साहित्यासाठी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित🌟
✍️ मोहन चौकेकर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते देशभरातील १७ वीर बालकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या दोन धाडसी मुलींचा समावेश आहे. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी , राज्यमंत्री सावित्री ठाकूर तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा १४ राज्यांमधील १० मुली व ७ मुले असे एकूण १७ बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा,क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.
💫करीना थापाचे शौर्य : ७० कुटुंबांचे प्राण वाचवले :-
अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये १५ मे २०२४ रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने ७० कुटुंबांचे प्राण वाचवले. एका फ्लॅटमध्ये आग लागल्याचे दिसताच, करिनाने प्रसंगावधान दाखवत कुलूप तोडून आत प्रवेश केला. सिलेंडरजवळील आग आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची भीती टळली.
💫केया हटकर: साहित्य आणि समाजकार्याची ओळख :-
मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. तिच्या "डान्सिंग ऑन माय व्हील्स" आणि "आय एम पॉसीबल" ही दोन्ही पुस्तके जागतिक स्तरावर नावाजली गेली आहेत. १३ वर्षांच्या केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य २६ देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. केया १० महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या आजाराने ग्रसित आहे, ज्यामुळे ती कायमस्वरूपी व्हीलचेअरवर असते. मात्र, तिने हा आजार तिच्या यशाच्या मार्गातील अडथळा होऊ दिला नाही. तिच्या साहित्य व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या