🌟यावेळी खा.शरदचंद्र पवार यांनी आंबेडकरी चळवळीने सुरु केलेल्या धरणे आंदोलनास भेट दिली🌟
परभणी (दि.२१ डिसेंबर २०२४) : आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिवंगत विजय वाकोडे यांच्या कुटूंबियांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी आज शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनांच्या, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज शनिवारी दुपारी परभणीत दाखल झाले होते. डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्या पाठोपाठ पवार यांनी आंबेडकरी चळवळीने सुरु केलेल्या धरणे आंदोलनास भेट दिली तेथून वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी जावून वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. तसेच कुटूंबियांबरोबर हितगुज केले. यावेळी परिवारातील सदस्यांनी घडलेल्या घटने संदर्भात सविस्तर माहिती दिली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी जाणीवपूर्वक वाकोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. वास्तविकतः ते हे संपूर्ण आंदोलन शांततेने हाताळण्याकरीता प्रयत्न करत होते, हे निदर्शनास आणून दिले. एकंदरीत घडलेल्या घटनेतून, ताणतणावातून आणि पोलीस प्रशासनाने सुरु केलेल्या कठोर कारवाईमुळेच ते अस्वस्थ होते, हेही स्पष्ट केले. त्यामुळेच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, असेही नमूद केले. वाकोडे हे आयुष्यभर आंबेडकरवादी चळवळीत अग्रभागी होते. छोट्या मोठ्या प्रश्नांवर न्याय हक्काकरीता सर्वसामान्यांच्या हिताकरीता ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले, असेही कुटूंबियांनी म्हटले. आमच्या परिवाराचे ते कर्ते पुरुष होते. त्यामुळे शासनाच्या वतीने आर्थिक मदत व्हावी आणि एक सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे, असे परिवारातील सदस्यांनी म्हटले.
दरम्यान, ज्येष्ठ नेते खा.पवार यांनी सर्व बाबी ऐकून सर्वोतोपरी मदत केली जाईल, राज्य सरकारबरोबर चर्चा केली जाईल, आम्ही आपल्या परिवारासोबत आहोत, न्याय मिळवून देवू, असे म्हटले. यावेळी पत्नी श्रीमती अलकाताई विजय वाकोडे, मुलगा आशिष वाकोडे, सिद्धांत वाकोडे, मुलगी प्रियांका वाकोडे, सुप्रिया पोपटकर, विशाखा ढाले, सून शितल वाकोडे तसेच बंधू सुरेश वाकोडे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी राज्यसभेच्या खासदार फौजिया खान,खासदार बजरंग सोनवणे,खासदार निलेश लंके, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या