🌟श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आल्यामुळे आता पुढील काही दिवस गुराढोरांची तहान भागवण्यास मदत🌟
परभणी (दि.०२ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील वडगाव,लोहिग्राम,थडी उक्कडगांव अशा विविध गावात दि.२८ नोव्हेबर२०२४ रोजी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून याचा शेतकर्यांना फायदा होत आहे. श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आल्यामुळे आता पुढील काही दिवस गुराढोरांची तहान भागवण्यास मदत होणार आहे.
जलसंधारणाच्या स्थायी उपचारा सोबतच अत्यंत अल्प खर्च असणारा पर्याय म्हणजे वनराई बंधारे बांधण्याचा आहे. पावसाळा संपण्याच्या वेळी पावसाची तीव्रता व नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी झाल्यानंतर कमी उताराच्या जागी वाळू, मातीने सिमेंटच्या रिकाम्या गोण्या भरून वनराई बंधारे बांधणे गरजेचे झाले आहे. वनराई बंधार्यामुळे जमिनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन आजूबाजूच्या विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते. तसेच गुरा ढोरांची सुध्दा तहान भागवली जाते. एवढेच नव्हे तर रब्बी पिकांना पाणी देण्यास मदत होते, पर्यायाने उत्पन्नात वाढ होते.तालुका कृषी विभागाच्या वतीने लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे चालू आहे. थडी उक्कडगाव येथील बंधारा बांधण्याकरीता तालुका कृषी अधिकारी श्रीमती प्रियंका कावरे, मंडळ कृषी अधिकारी कारभारी पौळ, कैलास गायकवाड, कृषी पर्यवेक्षक विष्णु मुंडे, मोतीराम भंडारे, कृषी सहाय्यक महादेव लव्हाले, महेश घेवारे, पतंगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यात वनराई बंधारे उभारण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी रवि हरणे , प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी श्रीमती प्रियंका कावरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.....
0 टिप्पण्या