🌟गंगाखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात....!


🌟लाचखोर लिपीका विरोधात गंगाखेड पोलिस स्थानकात तक्रार दाखल🌟

परभणी (दि.१८ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक या पदाचा अतिरिक्त कारभार असणार्‍या प्रकाश विठ्ठलराव टाक या कर्मचार्‍यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित तक्रारकर्त्याकडून ०४ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याची तयारी दर्शविल्याबद्दल गंगाखेड पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

                 गंगाखेड येथील या तक्रारकर्त्याने नगरपरिषद हद्दीतील प्लॉट खरेदी करणे असल्याने ०३ डिसेंबर २०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात किती शुल्क लागेल अशी विचारणा केली तेव्हा तेथील प्रकाश टाक या लिपीकाने खरेदीखत करण्याकरीता सहा ते सात हजार रुपये लागतील व त्या व्यतिरिक्त एक हजार रुपये आणखीन लागतील असे नमूद केले संबंधित तक्रारकर्त्याने शुल्का व्यतिरिक्त मागितलेली एक हजार रुपयांची रक्कम द्यावयाची इच्छा नसल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि.०४ डिसेंबर २०२४ रोजी पडताळणी केली तेव्हा संबंधित लाचखोर लिपीक प्रकाश टाक याने खरेदी करावयाच्या असलेल्या प्लॉटच्या खरेदीखताकरीता ०७ हजार ७०० शासकीय शुल्क आहे असे नमूद करीत या व्यतिरिक्त इतर ०५ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हटले. संबंधित तक्रारकर्त्याने काहीतरी कमी करा अशी विनंती केली. त्यावेळी तडजोडीअंती टाक याने ०४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याची तयारी दर्शविली. पडताळणी दरम्यान ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर संबंधित लिपीकाविरुध्द या खात्याने गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस निरीक्षक बसवेश्‍वर जक्कीकोरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निलपत्रेवार, भूमकर, कुलकर्णी, सीमा चाटे, अतूल कदम, शेख जिब्राईल, नागरगोजे, कदम, नरवाडे आदी कर्मचार्‍यांनी या कारवाईत भाग घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या