🌟यावेळी सुखबीरसिंघ बादल पेक्षा जास्त सहानुभूति त्यांचे हल्लेखोर नारायणसिंघ चौरा यांच्या वाट्याला🌟
✍️प्रासंगिक लेख : लेखक - स. रविंद्रसिंघ मोदी नांदेड
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर बुधवारी अमृतसर येथे अचानकपणे जीवघेणा हल्ला करण्यात आला आणी त्याच्यातून ते सुखरूप बचावले. त्यामुळे राजकारण क्षेत्रातील एक मोठी अतिश्योक्ति टळली म्हणायला हरकत नाही. वरील घटनेमुळे पंजाब मध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापु लागले आहे. राजकीय वादविवाद सुरु होऊन आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. पण एकूणच या घटनेबद्दल शीख समाजातून सुखबीर सिंघ बादल यांना सहानुभूति मिळत नसल्याचेच प्राथमिक चित्र समोर आले आहे. त्यामुळे जागतिकस्तरावर हेच संदेश प्रसारित होत आहे की, जरी श्री अकाल तख्त साहेब येथे माफी मिळाली तरी शीख समाज सहजतने त्यांचे कृत्य खपवून घेणार नाही. मागील दशकात घडलेल्या शीख विरोधी घटना आणी त्यातून निर्माण झालेली अस्थिरता याचे मूल्यांकन करणे खूपच कठीण असे आहे. सुखबीरसिंघ बादल आणी त्यांच्या समर्थकांचा श्री गुरु ग्रन्थसाहेबजी यांच्या अवमानेच्या काही घटनांमध्ये असलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग. डेरा सच्चासौदाच्या संत रामरहीम यांच्या पाठीशी ऊभे टाकण्याची त्यांची हिमाकत निंदनीय अशी आहे. दि. 1 जून 2015 आणी दि. 12 ओक्टोबर 2015 मध्ये बरगाडी फरीदकोट जिल्ह्यात घडलेल्या अवमाननाच्या घटना आणी नंतर बाहिबलकला येथे झालेल्या गोळीबारात बळी पडलेल्या नागरिकांच्या घटना आज ही लोकांच्या स्मरणार्थ आहेत. सतत दोन तीन वर्षें अशा संतापजनक घटना होत गेल्या आणि शीख समुदाय खिन्न होत गेला. समाजात मोठी अस्थिरता व्याप्त झाली. म्हणून यावेळी सुखबीरसिंघ बादल पेक्षा जास्त सहानुभूति त्यांचे हल्लेखोर नारायणसिंघ चौरा यांच्या वाट्याला जात असल्याचा वातावरण पंजाब मध्ये दिसत आहे.
दोन दिवसापूर्वीच सुखबीरसिंघ बादल, परमिंदरसिंघ ढिंडसा, प्रेमसिंघ चंदूमाजरा, बीबी जगीरकौर सह शिरोमणि अकाली दल आणी शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीशी संबंधित जवळपास पंधरा व्यक्तींना श्री अकाल तख्त साहेब तर्फे दोषीकरार (गुन्हेगार) ठरवण्यात आले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिण्यात त्यांना श्री अकाल तख्त साहेब तर्फे तन्खय्या (समाज बहिष्कृत) जाहीर करण्यात आले होते. पंजाब मध्ये वर्ष 2007 पासून वर्ष 2017 पर्यंतच्या कालावधीत घडलेल्या अनेक राजकीय घटनामध्ये शिरोमणि अकाली दल आणी एसजीपीसी संस्थेच्या काही लोकांचा, शीख विरोधी शक्तींना असलेला छुपा राजकीय पाठबळ असल्याचे पुढे आले. धर्म आणी सामाजाविरोधात काटकारस्थान करणारी ही मंडळी तनखैया होऊन सुमारे सहा महिन्यानंतर श्री अकाल तख्त समोर गुन्हेगार म्हणून हजर झाली. तर काही प्रभावी नेते अद्याप हजर झाली नाहीत. काहीनी पक्ष सुद्धा बदलला आहे आणी ते सत्तेत देखील आहेत.
श्री अकाल तख्त साहेब धार्मिक प्रशासनातर्फे मंगळवार दि. 3 डिसेबर रोजी, धर्मपीठा समोर उपस्थित सर्व दोषी व्यक्तींना श्री हरिमंदर साहेब अमृतसर गुरुद्वारा परिसरातील शौचालय स्वच्छ करणे, लंगर मध्ये भांडे घासणे, श्री सुखमणि साहेबचे पाठ करणे, कीर्तन एकणे आणी मानसिक पश्चायाताप करण्यासारख्या सामान्य शिक्षा (सजा) सुनावण्यात आल्यात. सुखबीरसिंघ बादल यांच्या पायाला दुखापत असल्यामुळे त्यांना द्वारपाल म्हणून तैनात राहण्याचे तसेच भांडी स्वच्छ करण्यासारखी सहज शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा घोषित होताच सजायाफ्ता व्यक्तींकडून मंगळवारीच सेवा सुरु करण्यात आली. देशविदेशतील शीख समुदायाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले.
सुखबीरसिंघ बादल हे बुधवारी दुपारी द्वारपाल म्हणून शिक्षा भोगत खुर्चीवर बसलेले होते. त्याच वेळी नारायणसिंघ चौरा नावाचा सत्तरी पार व्यक्ती तिथे चालून आला आणी त्याने खिशयातील पिस्तौल काढून बादल यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. जवळच उपस्थित असलेल्या जसबीरसिंघ नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने स्फूर्तीने नारायणसिंघ यांचा हात पकडून हा हल्ला नाकाम ठरवला. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. अन्यथा त्या घटनेने पंजाब मध्ये वेगळेच वळण घेतले असते. गुरुद्वारा परिसर समोर उद्भवलेले हे प्रसंग निंदनीय आहे. सेवेत असतांना त्यांच्यावर कोणी हल्ला करावे ही गोष्ट समर्थन करण्याजोगी नाहीच. नारायणसिंघ चौरा नावाचा हा गृहस्थ हा 1984 नंतर पंजाब मध्ये सुरु झालेल्या खालिस्तान आंदोलनात सहभागी होता असे बोलले जात आहे. त्याने अनेक वर्षें कारावासाची शिक्षा सुद्धा भोगलेली आहे. त्याचा सम्बन्ध कट्टर 'बबर खालसा' संघठनेशी असल्याचे उघड झाले आहे. पंजाब पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशी नंतरच हल्ला करण्याचे मूळ कारण स्पष्ट होईल. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा पंजाब राज्य हदरून गेले आहे. दुसरीकडे सुखबीरसिंघ बादल आणी त्यांच्या समर्थकांना वरील घटनेचे राजकीय भांडवल करण्याची एक संधी लाभली गेली असे म्हंटल्यास वावगं ठरू नये. गेल्या दशकभरात सुखबीरसिंघ बादल यांचे नेतृत्व असलेल्या शिरोमणि अकाली दल या राजकीय पक्षाची मोठी घासरण झालेली आहे. मागील निवडणुकीत पंजाबच्या विधानसभेत शिअद पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ नये या पेक्षा मोठी शोकांतिका आणखीन काय होऊ शकते? लोकसभेत देखील शिरोमणि अकाली दलाचा एकच खासदार निवडून येऊ शकला. गेल्या शंभर वर्षातला शिअदाचा हा सर्वात वाइट प्रदर्शन म्हणावा लागेल. शिरोमणि अकाली दलाच्या या घासरण मागे शीख समुदायाची व्यथित भावना श्री गुरु ग्रन्थसाहेब यांच्या अवमाननेच्या घटनेशी प्रभावित असणार यात दुमत नाही. म्हणूनच तर गेली दहा वर्षें पंजाबच्या लोकांनी शिअद आणी त्यांच्या मित्र पक्षाकडे पाठ फिरवलेली आहे. तेव्हा धार्मिक शिक्षा पूर्ण केल्याचा सुखबीर सिंघ बादल यांचा आविर्भाव आणी 'हल्ला' प्रकरणाची सहानुभूति हे मुख्य भांडवल शिअद पक्षाचा राजकीय मुद्दा असणार असे स्पष्ट आहे. पण पंजाब मधील शीख समुदाय त्यांच्या पाठी उभं टाकणार का? हे सर्वात ज्वलंत प्रश्न असणार आहे. यावेळी तर शीख समुदायने सुखबीरसिंघ बादल यांच्यावर झालेल्या आक्रमणाकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे. राजकीय समीक्षाकांच्या मते शिअदाचे राजकीय भवितव्य अंधारातच आहे.
💥फक्र-ए-कौम सन्मान परत :-
सन्मान आणी पुरस्कार नेहमीच विचार करुन आणी दूरदृष्टि ठेवूनच दिले गेले पाहिजे. सुखबीरसिंघ बादल यांचे दिवंगत वडील माजी मुख्यमंत्री स्व. प्रकाशसिंघ बादल यांना देण्यात आलेला "फक्र - ए - कौम" हे सन्मान श्री अकाल तख्त साहेबच्या पंजप्यारे साहिबान यांच्या तर्फे परवाच्या दिवशी परत घेण्यात आला आहे. श्री अकाल तख्त साहेबचे जत्थेदार ज्ञानी रघुबीरसिंघ यांनी सन्मान परत करण्याचे फरमान सुनावले. बादल कुटुंबियासाठी ही गोष्ट सर्वात लजीरवाणी असल्याचे बोलले जात आहे. स्व. प्रकाशसिंघ बादल यांनी तत्काळात श्री अकाल तख्त साहेबच्या पंजप्यारे साहिबान यांना घरी बोलावून धमकावल्याचा आणि दबाव टाकल्याचा ठपका सुखबीर सिंघ बादल कुटुंबियावर आहे. वरील सन्मान गमावल्याचा नुकसान अनंत काळ बादल कुटुंबियांना होत राहणार यात शंका नाही.
✍️लेखक : स.रविंद्रसिंघ मोदी,
वरिष्ठ पत्रकार,नांदेड
0 टिप्पण्या