🌟राज्यातील महायुतीचा निर्णय : जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाला पालकमंत्रिपद....!


🌟पालकमंत्रिपदावरून महायुतीत कुठलीही कुरबुर नाही : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे🌟

मुंबई (दि.२४ डिसेंबर २०२४) - राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या भरघोस यशानंतर एका महिन्याने राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपासह आकाराला आले. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांनी सांगितले. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे.

 
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर १२ दिवसांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यानंतर १० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. खातेवाटपासाठी मंत्र्यांना ७ दिवस वाट बघावी लागली. आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना प्रतीक्षा आहे ती पालकमंत्रिपदाच्या वाटपाची. तीनही प्रमुख पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. खातेवाटपातही ते दिसले. पालकमंत्रिपदाची नावे लवकर जाहीर होतील. पालकमंत्रिपदावरून महायुतीत कुठलीही कुरबुर नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या