परभणी :- परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या आंदोलनात अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अनुषंगाने काल गुरुवार दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देवून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. जिल्हाधिकारी यांनी आंदोलनातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे यावेळी सांगितले.
दरम्यान परभणी शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ पथके गठीत केलेले असून सदर पथक व्यापारी व व्यवसायिक यांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करणार आहेत. पंचनाम्याची कार्यवाही आज सकाळी सुरू झाली असून सुमारे 30 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत व उर्वरीत पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाने कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच पंचनामे करण्यासाठी येणा-या पथकास सहकार्य करुन शहरात शांतता ठेवावी,असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या