🌟शेतकर्यांकडून पंधरा हजार रूपये लाच घेतल्याचे प्रकरण आले अंगलट🌟
परभणी (दि.०७ डिसेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील कोल्हा येथील एका शेतकर्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी करून कंत्राटी तंत्रज्ञामार्फत १५ हजार रूपये स्विकारल्याच्या प्रकरणात नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता आरोपी मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत यास दि.२७ नोव्हेंबर २०२४ पासून सेवेतून निलंबित केले आहे.
शेतीच्या जलसिंचनाकरिता विद्युत मोटार असून त्यांचा शेतात जलसिंचन करण्यासाठी विजेची आवश्यकता असल्याने विद्युत रोहित्र बंद असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी संबंधित तक्रारदार शेतकर्याने दि.१९ नोव्हेंबर २०२४ रोजी कनिष्ठ अभियंंत्याची भेट घेतली. त्यावेळी त्याने अहवाल देण्यासाठी २० हजार रुपये लागतील असे सांगितले व तडजोडी अंती १५ हजाराची मागणी करून ही रक्कम बाह्यस्रोत कंत्राटी तंत्रज्ञ महेश शिवरुद्र कोल्हेकर यांच्याकडे देण्यास सांगितले यावरून कनिष्ठ अभियंत्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून कनिष्ठ अभियंता मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत आणि कंत्राटी तंत्रज्ञ महेश शिवरुद्र कोल्हेकर यांच्याविरूध्द मानवत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून दि.२७ नोव्हेंबर २०२४ ला रात्री अटक केली होती.
दरम्यान, हा प्रकार महावितरण कर्मचारी सेवाविनियम २००५ मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाचे असून याकरिता कनिष्ठ अभियंत्यास कंपनीच्या सेवेमध्ये राहू देणे कंपनीच्या कामकाजास व हितसंबंधास बाधा आणणारे आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कर्मचारी सेवाविनियम कायद्या अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी त्या कनिष्ठ अभियंत्यास सेवेतून निलंबित केले आहे......
0 टिप्पण्या