🌟मित्रा,साथ सोडलिस.शेवट पर्यंत लढत होतास समाजासाठी.समाजाच्या हिता सुखासाठी....!


🌟महाराष्ट्र आज जातीय धर्मांधतेने पेटतो आहे दलीतांवरील अत्याचार वाढले आहेत🌟

✍️लेखक :  प्रकाश दादा कांबळे जेष्ठ आंबेडकरी विचारवंत 

मित्रा,साथ सोडलिस.शेवट पर्यंत लढत होतास समाजासाठी.समाजाच्या हिता सुखासाठी.समाजाच्या वेदना पोटतिडकीने मांडीत होतास शासन दरबारी.समाजाच्या वेदनांना हुंकार देता देता निघून गेलास.परभणी शहराचा आधार होतास मित्रा तू.मोठ्या धाडसाने शहीद सोमनाथ सुर्यवंशीला निरोप दिलास आणि आमच्यावर तुला निरोप देण्याची वेळ आणलीस ? तेंव्हाच का नाही सांगितलास ह्रुदयात होणारा त्रास ? महाराष्ट्र आज जातीय धर्मांधतेने पेटतो आहे दलीतांवरील अत्याचार वाढले आहेत.


अशा प्रसंगी अन्याय्य आत्यच्याराला वाचा फोडण्यासाठी  तुझ्याशिवाय परभणी शहरात आता कुणाला शोधावे ? सर्वांच्या हक्काचे नावं तू होतास.परभणी जिल्ह्याचा तू 'बाबा' होतास तुझे छत्र आज नियतीने हिसकावून घेतले ते आम्ही कुठे शोधावे ? परभणीत तुझा कुठे दरारा नव्हता ? शासनात,प्रशासनात,विविध जाती आणि धर्मातील लोकातही तुझे स्थान फार वेगळे होते मुस्लिम समाजाने तर तुला गळ्यातील ताईत बनविले होते.असा सन्मान दलित पँथरचे नेते म्हणून तुलाच होता मित्रा!

    तुझ्या अकाली जाण्याने कुटुंबाची आणि समाजाची फार मोठी हानी झाली आहे.ती कशी भरून निघणार?आज पँथर च्या काळातील सर्व आठवणी येताना डोळे भरून येत आहेत.नामांतराचा लढा आपण सोबत लढलो.पिंपरी देशमुख चे अत्याचार प्रकरण,घाटकोपर येथील हत्याकांड,खैरलांजी चे हत्याकांड,गायरान जमिनींचे पट्टे दलितांच्या नावे करण्यासाठी

केलेली रस्त्यावरची अनेक आंदोलने,अशी परभणी जिल्ह्याचे अनेक प्रकरणे आणि राज्यातील अनेक प्रश्नांवर केलेली आंदोलने,आणि पोलिसांचे खाल्लेले रट्टे आणि जेलची हवा,सर्व कांहीं आज आठवतो.ते सर्व प्रसंग चल चित्रपटाप्रमाणे नजरेसमोर तरळत आहेत. तो चित्रपट पूर्ण होण्या अगोदरच तू अर्ध्यात सोडून गेलास मित्रा.तो आता पूर्ण कोण करणार ? परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील तू परभणी जिल्ह्याचे मुख्य पात्र होतास.

मोठा नेता होतास पददलित समाजाचा तू आधार होतास तो लोप पावला.तो आम्ही कुठे शोधावा?बोलत चालत निघून गेलास.फार मोठा चटका दिलास मित्रा.असे व्हायला नको होते.तुझ्या आठवणी आता रोज सतवतील.तू सर्वांना गाफील ठेवून जिंकलास मित्रा तुझ्या आयुष्याची लढाई.तुझे जीवन सार्थकी लागले तुझ्या नावातला 'विजय' सार्थ ठरला.

   मित्रा,तुला दबडबल्या अश्रूंनी भावपूर्ण श्रद्धांजली.....💐

- प्रकाश कांबळे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या