🌟लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप🌟
परभणी (दि.२३ डिसेंबर २०२४) : परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणानंतर झालेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला.
खासदार गांधी यांनी दिवंगत भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या कुटूंबियांचे सांत्वन केल्यानंतर त्यांच्या नवा मोंढा येथील निवासस्थानाच्या परिसरात प्रसार माध्यमांशी काही मिनिटे संवाद साधला यावेळी बोलतांना खा.गांधी म्हणाले की आपण सुर्यवंशी कुटूंबियांचे सांत्वन केले त्यांचे म्हणणे ऐकले. एकूण स्थितीची माहिती घेतली आहे सुर्यवंशी या युवकाच्या हत्येस केवळ पोलिस जबाबदार असल्याचे स्पष्ट असून पोलिस कोठडीत केलेल्या मारहाणीमुळेच सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाला असेही ते यावेळी म्हणाले.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिलेली माहिती पूर्णतः खोटी आहे, असे नमूद करीत गांधी यांनी मूळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान विरोधी धोरणच या सर्व घटनाक्रमांना कारणीभूत असल्याचा आरोपही गांधी यांनी केला. या प्रकरणात आम्ही पूर्णपणे चौकशीची मागणी करणार असून निश्चितच यातून सत्य बाहेर येईल व सूर्यवंशी कुटूंबियांना न्याय मिळेल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथाल, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते विजय वडेवट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, श्रीमती यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार संजय जाधव, काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर,माजी आमदार सुरेश दादा देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, प्रदेश काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते......
0 टिप्पण्या