🌟जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगामात 3 पाणीपाळी देण्याचे नियोजन....!


🌟पिकांसाठी पाणी घेण्यासाठी लाभधारकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन🌟

 परभणी (दि.05 डिसेंबर 2024) : जायकवाडी प्रकल्प पैठण डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील कि.मी. 122 ते 208 मुख्य कालवा व त्या वरील सर्व वितरण प्रणाली कालव्या वरील मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगामात 3 पाणीपाळी देण्याचे नियोजन आहे. 

रब्बी हंगामात येणारी  पिके उदा. ज्वारी, गहु मका, हरभरा, कापुस, तुर, तेलबिया इत्यादी तसेच रब्बी हंगामातील इतर दुहंगामी व उभी पिके (कालावधी 15 ऑक्टोबर,2024 ते 28 फेब्रुवारी, 2025) या पिकासाठी कालव्याचे प्रवाही/ कालव्यावरील उपसा, नदीनाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनाव्दारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी अर्ज दि. 26 डिसेंबर, 2024 पर्यंत शाखा कार्यालयात दाखल करावे पाणी अर्ज शाखा कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. मागणी अर्ज नमुना नंबर 7,7-अ मध्ये भरुन संबंधीत शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन उप कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. 2 यांनी केले आहे.

कालवा संचलन कार्यक्रम प्राप्त मागणी क्षेत्रानुसार करण्यात येईल. नमुना नंबर 7, 7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास खालील शर्तीचे व अटीचे अधीन राहून मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना त्यांचेकडील संपुर्ण थकबाकी व चालू हंगामातील कालव्याचे पाणी घेतलेल्या पिकांची अग्रीम पाणीपट्टी भरावी लागेल. पाणी अर्जा सोबत अपत्या बाबतचे प्रमाणपत्र, अल्प व अत्यल्प भूधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र सादर न केल्यास सुट/ सवलती व प्रोत्साहने याचा लाभ घेता येणार नाही व शासन निर्णयातील तरतुदी नुसार दंडात्मक कार्यवाही केली जाईल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरचे पटीत असावे. मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी (कालवा उपसा, नदीनाले) पाणी अर्ज मंजूर करुन घेवूनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा. पाणी अर्जा सोबत उपसा सिंचनाच्या परवानगीची प्रत जोडावी.

मंजुर क्षेत्रास कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यामध्ये 3 मोटरचे (10 फुट) अंतर असले पाहिजे म्हणजेच पाटमोट संबंध नसावा. असा सबंध असल्यास कालवा प्रवाही पध्दतीने सिंचन केले असे समजून आकारणी करण्यात येईल. पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही व त्यांचा पाणी पुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल. शासन निर्णय व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांचे आदेशानुसार ठोक जलदर त्यांसबंधीत उत्तर सर्व अटी व नियम पाळण्याचे बंधनकारक राहील. सिंचन शाखा कार्यालयात शासन निर्णयाचा सविस्तर तपशील पहाण्यासाठी उपलब्ध आहे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधीत लाभधारकाची आहे. उडाप्याचे क्षेत्रास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार नैसर्गीक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही. जायकवाडी प्रकल्प डावा कालवा कि.मी. 122 ते 208 पर्यंत व त्या अंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेव्दारे जिथे सुलभपणे पाणी जावू शकते तिथपर्यंत प्रत्येक पाणी पाळीच्या कालवा संचलन नियमाचे पालन होईल याची खबरदारी लाभधारकांनी घ्यावी. कालव्याच्या काही ठिकाणी फुटतुट झाली असुन त्याची दुरुस्ती शक्य न झाल्यास त्यावरील लाभधारकांना सिंचनासाठी पाणी देणे शक्य होणार नाही.

लाभधारकांनी दिवस व रात्र पाणी घेणे बंधनकारक आहे. जायकवाडी प्रकल्पा अंतर्गत असलेल्या लाभधारकांनी याबाबत योग्य ते सहकार्य करावे. पाणी वापर सस्थांनी मागील थकबाकी व अग्रीम पाणीपट्टी भरुन प्रत्येक पाणीपाळी पुर्वी पाणी मागणी करणे आवश्यक आहे. काही तांत्रिक अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगावू सुचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांना राहतील, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे...... 

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या