🌟बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू🌟
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फेघेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत तर इयत्ता दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने सचिव देविदास कुल्हाळ यांनी आज इयत्ता दहावी व बारावी परीक्षांच्या वेळापत्रकाची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे उपलब्ध होणार आहेत. दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात, दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. त्यानंतर निकाल मे-जूनमध्ये जाहीर केला जातो. या दरम्यान विविध प्रवेश परीक्षा होतात. तसेच नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्टमध्ये होते. या सर्व प्रक्रियेत जाणारा वेळ, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणे, प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने यंदा बारावी- दहावीच्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अंतिम वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे......
0 टिप्पण्या