🌟आळंदीत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माउलींचा रथोत्सव उत्साहात ; वारकरी भक्तिरसात चिंब.....!


🌟वारकरी तसेच रस्त्याच्या दुतर्फा श्रींच्या दर्शनास ग्रामस्थांनी, भाविकांनी गर्दी केली होती🌟

✍️ मोहन चौकेकर 

वीणा,टाळ आणि मृदंगाच्या त्रिनादासह माउली, माउली, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, ज्ञानोबा माउली, तुकारामांच्या जयघोषात भाविक, वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिक वद्य द्वादशीनिमित्त ज्ञानेश्वर माउलींचा रथोत्सव साजरा झाला नरसिंह सरस्वती यांनी बनविलेल्या १५० वर्षे जुन्या सिसम लाकडी रथातून रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. रथोत्सव गोपाळपुरातून नगरप्रदक्षिणा मार्गे श्रींच्या मंदिरासमोर आला. रथोत्सवात हजारो भाविकांनी जयघोष केला. भाविक भक्तिमय वातावरणात चिंब झाले.वारकरी तसेच रस्त्याच्या दुतर्फा श्रींच्या दर्शनास ग्रामस्थांनी,भाविकांनी गर्दी केली होती.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा आळंदीत अलंकापुरीत जमला आहे.४ / चार  लाखांहून अधिक वारकरी व भाविक  आळंदीत दाखल झाले आहेत.श्री संतक्षेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा गुरुवारी  संपन्न होत आहे. तर, रविवारी सोहळ्याची सांगता होणार आहे. बुधवारी पहाटे खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते द्वादशीची शासकीय महापूजा झाली. मुक्ताई मंडपात काकडा भजन, भाविकांच्या महापूजा (श्रींच्या चलपादुकांवर), महानैवेद्य, रथोत्सव, कीर्तन, वीणा मंडप, धुपारती असे विविध कार्यक्रम झाले. सायंकाळी रथोत्सव पार पडला. रथोत्सवप्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, श्रींचे पुजारी अमोल गांधी, अवधूत गांधी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, योगी निरंजन, डॉ. भावार्थ देखणे, संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.

श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांच्या दिंडीतून भगव्या पताका उंचावत माउली माउली’चा गजर करत रथोत्सव सुरू झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक, जुना नगरपरिषद चौक, माउली मंदिर या मार्गावरून हरिनाम गजरात प्रदक्षिणा झाली. मंदिरासमोरील महाद्वारात आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली. मंदिरात प्रदक्षिणा, धुपारती झाली. रथोत्सवापूर्वी आळंदीकर ग्रामस्थांनी श्रींची पालखी खांद्यावर घेत गोपाळपूरपर्यंत हरिनाम गजरात आणली.

श्रींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा आज गुरुवारी असून, विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा होत आहे. विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते श्रींना पवमान अभिषेक व दुधारती करण्यात आली. वीणा मंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे कीर्तन सेवा रुजू होईल. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे कीर्तन झाले आहे. महाद्वारात काल्याचे कीर्तन झाल्यानंतर श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या दिंडीची मंदिर प्रदक्षिणा झाली. दुपारी बाराच्या सुमारास श्रींच्या संजीवन समाधीवर पुष्पवर्षा, आरती व घंटानाद करण्यात आला.

💥आळंदी अलंकापुरी गर्दीने फुलली :-

इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली दिसते आहे. वारकऱ्यांच्या उपस्थितीने इंद्रायणी नदीकाठ फुलून गेला आहे. पहाटेपासूनच इंद्रायणीच्या तीरावर बोचऱ्या थंडीत वारकरी तीर्थस्नान करत आहेत. अनेक दिंड्या नदीवर आल्याने वारकरी महिला व पुरुष पाण्यात आपल्या भगव्या पताका भिजवून इंद्रायणी नदीस नमस्कार करून फुगड्या खेळत आहेत. टाळ मृदंगाच्या निनादात तसेच ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषात परिसर भारावून गेला आहे. महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल-रुक्मिणी, माउलींची मूर्ती घेऊन नदीकाठी टाळ्या वाजवत आहेत. संपूर्ण अलंकापुरी आनंदी व भक्तिमय वातावरणात गर्दीने फुलून गेली आहे........

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या