🌟सॅटेलाईट ब्रॉडबँड इंटरनेट स्पेक्ट्रमचे वाटप लवकरच होणार ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली घोषणा🌟
जगातील दिग्गज उद्योगपती इलॉन मस्क यांच्यासाठी भारतातून एक आनंदाची बातमी आली आहे. स्टारलिंक कंपनीद्वारे सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या इलॉन मस्क यांच्यासाठी भारताचे दरवाजे लवकरच खुले होणार आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सॅटेलाइट ब्रॉडबँडच्या स्पेक्ट्रम वाटपावर मोठी घोषणा केली आहे.
* स्पेक्ट्रमचा लिलाव नाही, तर वाटप होणार :-
ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सॅटेलाईट ब्रॉडबँडसाठी स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल, लिलाव होणार नाही. भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी आणि एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल यांनीदेखील ही मागणी केली होती. दोन्ही भारतीय अब्जाधीश उद्योगपतींच्या मागणीनुसार स्पेक्ट्रमचे वाटप केले जाऊ शकते. पण, सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रम मोफत देणार नसल्याचेही ज्योतीरादित्य सिंधियांनी स्पष्ट केले आहे. याची किंमत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ठरवणार आहे.
* ITU तत्त्वांचे पालन :-
ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की, प्रत्येक देशाला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) चे अनुसरण करावे लागेल. ही अंतराळ किंवा उपग्रह स्पेक्ट्रमसाठी धोरण तयार करणारी संस्था आहे आणि ITU ने असाइनमेंटच्या आधारावर स्पेक्ट्रम देण्याच्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले आहे. आज जगभर पाहिले, तर सॅटेलाईटसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव करणारा कोणताही देश नाही. दरम्यान,इलाॅन मस्क यांच्या स्टारलिंक आणि ॲमेझॉनच्या प्रोजेक्ट कुपर सारख्या जागतिक कंपन्यांनी स्पेक्ट्रम वाटपाचे समर्थन केले आहे.
* इलाॅन मस्क यांची स्टारलिंक कंपनी भारतात येण्यास उत्सुक :-
Jio आणि Airtel दोघेही सॅटेलाइट ब्रॉडबँड क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्पर्धा करत आहेत. तर, इलॉन मस्कदेखील जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारताच्या मोबाइल आणि इंटरनेट मार्केटमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. या स्पर्धेचा नागरिकांना , ग्राहकांना काय फायदा होईल व कोणत्या कंपनीची सॅटेलाईट ब्रॉडबँड इंटरनेट सेवा चांगली राहिल ते भविष्यात लवकरच कळेल असे दिसते आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या