🌟पालम तालुक्यातील चाटोरी येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन...!


🌟लाल सेनेने दिला निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा🌟

परभणी (दि.२६ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील चाटोरी येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमणे प्रशासनाने तात्काळ हटवावी अन्यथा परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० डिसेंबर २०२४ पासून बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा लाल सेनेच्या एका शिष्टमंडळाने प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

             लाल सेनेच्या वतीने आज मंगळवार दि.२६ नोव्हेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांना निवेदन सादर करण्यात आले. त्याद्वारे,  चाटोरी या गावात शासनाने गावठाण विस्तारासाठी विविध गटातील १४ शेतकर्‍यांकडून जमीन संपादित केली होती. संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला संबंधित शेतकर्‍यांना वितरितही केला. असे असतानाही  त्यांच्या वारसांनी संपादित केलेल्या जमिनीवर नव्याने ताबा केला आहे, ज्यात मातंग समाजाच्या स्मशानभूमीचाही समावेश आहे. त्यामुळे मातंग समाजाची ही स्मशानभूमी मुक्त करावी यासाठी यापूर्वी चाटोरीच्या ग्रामपंचायतीसह पालमच्या तहसीलदारांना अनेकवेळा निवेदने सादर करण्यात आली. परंतु त्याची कुणीही दखल घेतलेली नाही. याचाच गैरफायदा घेत मातंग समाजाची स्मशानभूमी गिळंकृत करण्यासाठी काही ग्रामस्थांनी या स्मशानभूमीवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे, असे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

          प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर लाल सेनेच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिन १० डिसेंबर पासून जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर मसन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर गणपत भिसे, उत्तम गोरे, अशोक उबाळे, अविनाश मोरे, एल.डी. कदम, गणेश गायकवाड, सुभाष गायकवाड, गंगाधर गायकवाड, केशव गायकवाड, शेषराव गायकवाड, बालाजी गायकवाड, महादेव गायकवाड, किशोर कांबळे, विकास गोरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या