🌟महानगर पालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईत २५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल🌟
परभणी (दि.३० नोव्हेंबर २०२४) : परभणी महानगर पालिका हद्दीतील विविध वसाहतींमध्ये थेट सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणार्या १३१ नागरीकांवर,संस्थांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत तब्बल २५ हजार ६०० रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आली आहे.
महानगरपालिकेद्वारे घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तूंचे अधिसूचना २०१८ च्या तरतुदीचे अनुपालन न करणार्या व्यक्ती व संस्थांविरुध्द दंडात्मक कृती केली जात आहे. प्रभाग समिती अ,ब, क मध्ये प्रशासनाने त्यासाठी एप्रिल २०२४ पासून पथके तैनात केली आहेत. या पथकाने आतापर्यंतच्या कालावधीत १३१ नागरीकांविरुध्द कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल दंडात्मक कारवाई करीत २५ हजार ६०० रुपये वसूल केले. तर उघड्यावर लघूशंका करणार्या चार व्यक्तींविरुध्द कारवाई करीत ८०० रुपये वसूल केले. कचरा जाळल्याबद्दल एका व्यक्तीविरुध्द कारवाई करीत ५०० रुपये दंड वसूल केला. उघड्यावर शौच करणार्या पाच नागरीकांकडून १३०० रुपये सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या एकाकडून ५०० रुपये, प्लास्टिकचा वापर साठवणूक केल्याबद्दल २० व्यक्ती व संस्थांकडून १ लाख ५ हजार रुपये,अनाधिकृत बॅनर लावल्याबद्दल ४४ व्यक्तींविरुध्द कारवाई करीत ७ हजार १०० रुपये वसूल केले एकूण २०६ जणांविरुध्द कारवाई करीत प्रशासनाने १ लाख ४० हजार ८०० रुपये दंड वसूल केला.
दरम्यान, महानगरपालिका हद्दीतील चोहोबाजूंच्या वसाहतीत स्वच्छता राखल्या जावी, या दृष्टीने अनेक संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरीकांच्या सहकार्याने प्रयत्न केले जात आहेत. सर्व नागरीक व व्यवसायिकांनी या मोहिमेत जमेल त्या पध्दतीने सहकार्य करणे गरजेचे आहे असे मत महापालिका आयुक्त धैर्यशिल जाधव, अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी व्यक्त केले. दरम्यान, शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य करा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे......
0 टिप्पण्या