🌟उमेदवार जखमी झाल्याने अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल🌟
✍🏻शिवशंकर निरगुडे हिंगोली
हिंगोली (दि.१९ नोव्हेंबर २०२४) - हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.दिलीप मस्के यांच्या वाहनावर पाच जणांनी दगडफेक केल्याची घटना काल सोमवार दि.१९ नोव्हेंबर २०२४ रोजी मध्यरात्री ०१.३० वाजता घडली असून यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.दिलीप मस्के हे सोमवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ आले असतांना त्या ठिकाणी एका स्वीफ्ट डिझायर वाहनातून आलेल्या पाच व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ते घाबरून गेले. हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीमध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच वाहनाच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक इंगळे जमादार कैलास सातव, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यकर्तेही एकत्र आले. या घटनेत जखमी झालेल्या डॉ. मस्के यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी.नांदेडला हलविण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तातडीने नांदेडला जाऊन त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा जवाब नोंदविला आहे. स्वीफ्ट कारमधून आलेल्या पाच जणांनी हा हल्ला केल्याचे जवाबात नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनोळखी पाच व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागिय पोलिस अधिकारी भुसारे स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी भेट दिली या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेवाळे हें करत आहेत.....
0 टिप्पण्या