🌟लोक अदालतमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास दाखल कोर्ट फीस नियमानुसार परत मिळते🌟
परभणी (दि.१३ नोव्हेंबर २०२४) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशान्वये येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे,भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१, बॅक वसूली प्रकरणे,मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, वीज प्रकरणे (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे, तसेच बँकेचे वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतमध्ये प्रकरणात तडजोड करण्यासाठी न्यायाधीश व वकील यांचे पॅनल मदत करणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. लोक अदालतमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास दाखल कोर्ट फीस नियमानुसार परत मिळते.
न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी संबंधित विधीज्ञ पक्षकारांना सहकार्य करतील, असे परभणी जिल्हा वकील संघाचे अॅड. एम. एस. सोळंके यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे ठेऊन तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन न्या. उज्ज्वला म. नंदेश्वर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व आपले प्रकरण लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या न्यायालयात,अथवा तालुका विधी सेवा समिती वा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे संपर्क करावा असे अर्चना एम. तामणे यांनी कळविले आहे........
0 टिप्पण्या