🌟परभणीतील ऐतिहासिक सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीवर जबरदस्त हल्लाबोल🌟
परभणी (दि.09 नोव्हेंबर 2024) : आपल्या कारकिर्दीत महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेसह तरुण वर्ग तसेच सर्वसामान्य शेतकर्यांकरिता राबविलेल्या महत्वाकांक्षी योजनांवर दररोज टिका टिप्पणी करणार्या महाविकास आघाडीने आपल्या वचननाम्यात याच यशस्वी योजनांचा नामोल्लेख करीत सरळ सरळ कॉपी केल्याचा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी आयोजित केलेल्या जाहीर सभेतून केला.
वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालया लगतच्या प्रांगणात मुख्यमंत्री शिंदे यांची आज शनिवार दि.09 नोव्हेंबर रोजी महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार भरोसे,भारतीय जनता पार्टीच्या आमदार तथा जिंतूर मतदारसंघातील उमेदवार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते विजय वरपूडकर, माजी आ.हरिभाऊ लहाने, प्रथम महापौर प्रताप देशमुख, माजी जिल्हा प्रमुख राजू कापसे, माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव, जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, युवा नेते प्रविण देशमुख, माजी जिल्हा प्रमुख भास्करराव लंगोटे, माजी खासदार अॅड. सुरेश जाधव पाटील, माणिक पोंढे, धम्मदीप रोडे यांच्यासह अन्य नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणातून शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वचन नाम्यासह धोरणांवर जोरदार हल्ला केला. महायुती सरकारने सुरू केलेल्या व अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या महत्वाकांक्षी अशा लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीरीत्या अंमलबजावणीसह तरुण वर्ग आणि सर्वसामान्य शेतकर्यांच्या वीज बिलांच्या माफीसह कल्याणकारी योजनांमुळे महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींत पोटसूळ उठले आहे. त्यापोटीच ते लाडकी बहीणसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल करीत सर्वसामान्य माणसात संभ्रम निर्माण करत आहेत. त्यातील काहींनी आम्ही या योजना बंद करु, अशा वल्गना सुध्दा केल्या. तर आघाडीतील श्रेष्ठींनी आम्हाला जाब विचारतेवेळी आमच्या यशस्वी ठरलेल्या योजना चोरून आपला वचननामा बनविला. विशेषतः महिलांना प्रतिमाह 3 हजार रूपये देण्याचे जाहीर करतेवेळी त्यासाठी पैसा कुठून आणणार? हे मात्र स्पष्ट केले नाही, अशी कोपरखळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मारली. आम्ही तर योजनेचे 5 हप्ते वाटप करून दाखवलेसुध्दा, मात्र अशा प्रकारे आघाडीने आपल्या वचननाम्यातून निव्वळ कॉपी करीत पास होण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आमचे सरकार सत्तेवर आल्यास सर्व योजना बंद करत दोषी असणार्यांना तुरुंगात टाकू, असा इशारा महाविकास आघाडीचे नेते देवू लागले आहेत. हिंमत असेल, तर या सर्व कल्याणकारी योजनांची आघाडीने कधीही खुशाल चौकशी करावी. लाडक्या बहीण-भावांसाठी तसेच शेतकर्यांसाठी आपण एकदा नव्हे, शंभरवेळा तुरुंगात जावयास तयार आहोत, असे ठणकावून शिंदे यांनी विरोधकांनाच एकप्रकारे आव्हानच दिले.
शिवसेनेचा प्राण असलेला धनुष्यबाण काही व्यक्तींनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवून आणण्याचे काम आम्ही केले, असे स्पष्ट करतेवेळी शिंदे यांनी त्याची शान वाढविण्याचे काम आता करायचे आहे, असे म्हटले. स्थानिक आमदाराने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काहीही काम करायचे नाही, मात्र दमडीचे काम करायचे आणि त्याचे श्रेय लाटण्यासाठीच पुढे यायचे असा प्रकार सातत्याने होत आला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या विरोधात भरघोस मतदान करीत परभणीला विकासाच्या वाटेवर नेऊन विकासाची पर्वणी साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या आणि पैशांच्या राशीत लोळणार्यांना दीड हजाराची किंमत काय? हे कधीही कळणार नाही, अशी टिका मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर केली. त्याची किंमत केवळ लाडक्या बहिणींनाच कळते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी श्री.भरोसे, श्री.वरपूडकर, माजी आ.लहाने, श्री.देशमुख यांनी मनोगत मांडले. सुत्रसंचालन सुनील तुरूकमाने यांनी केले. या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता......
0 टिप्पण्या