🌟राहुल गांधी ६ नोव्हेंबरला नागपूरातील संविधान संमेलनात सहभागी होणार......!


🌟ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे ६ नोव्हेंबर रोजी नागपुरात आयोजित संविधान संमेलनात भाग घेणार🌟 

✍️ मोहन चौकेकर 

ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे ६ नोव्हेंबर रोजी नागपुरात संविधान संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत ‘संविधान खतरेमे‘ हा मुद्दा काँग्रेससाठी चांगलाच फायद्याचा ठरला होता. भाजपने हे नॅरेटिव्ह खोडून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. आता पुन्हा काँग्रेसचे नेते राहूल गांधी पुन्हा संविधानाला उजळणी देणार आहेत. नागपूर येथे ओबीसी युवा मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान संमेलनात ते सहभागी होणार आहेत.

राहूल गांधी नागपूरमध्ये संविधानावर बोलणार असल्याने राजकीय धुरळा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल काँग्रेस रेशीमबागेतून फुंकणार असल्याचे या संमेलनातून स्पष्ट झाले आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात मनुवाद, संविधान, मनुस्मृतीत महिलांचे स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये फरक आहे यावर चर्चा होणार  आहे. राहूल गांधी उपस्थित राहणार असले तरी हा कार्यक्रम अराजकीय असल्याचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरूच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी संमेलनाचे आयोजन केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. या संमेलनात विदर्भातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वरूप राजकीय नाही. आचारसंहितेचे पालन करूनच कार्यक्रम होणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या