🌟भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांना पदावरून हटविण्याची मागणी....!


🌟नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन : मागणी मान्य न झाल्यास ०१ डिसेंबर पासून आंदोलनाचा इशारा🌟

नादेड : - नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असलेले गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांना पदावरून हटण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सरदार मनबिरसिंघ ग्रंथी यांच्यासह सहकाऱ्यांनी केली आहे अन्यथा येत्या ०१ डिसेंबर २०२४ पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


 सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासकपदी दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी डॉ.विजय सतबीरसिंघ यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकाच्या नियुक्तीनंतर गुरुद्वारा बोर्डाच्या हिताचे निर्णय घेऊन भाविकांना त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. याऊलट त्यांच्याकडून गुरुद्वारा बोर्डातील अखंडपाठ सह इतर भ्रष्टाचारांमध्ये सहभाग असलेल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

या निवेदनामध्ये गुरुद्वारा बोर्डातील अखंड पाठ विभागातील भ्रष्टाचारासह गुरुद्वारा बोर्डाचा इंजिनिअरिंग विभाग असताना महाराजा रणजीतसिंघ यात्री निवासच्या नवीन इमारतीचे काम विना करारनामा व विना ठराव गुरुद्वारा लंगर साहेब निधानसिंघ ट्रस्ट यांना देखील दिले आहे. तसेच गुरुद्वारा बोर्डाचा डोनेशन विभाग असताना देखील ही सेवा देण्याचे काम सदर ट्रस्टला दिले, गुरुद्वारा बोर्डाची जमीन खाजगी एजन्सीला पेट्रोल पंपासाठी देण्याचा निर्णय तसेच सचखंड पब्लिक इंग्लिश स्कूल मधील भ्रष्ट  प्राचार्य अनिलकौर खालसा यांचेवर कारवाई केली नसल्याने डॉ. विजय सतबीरसिंघ यांना पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. त्याकरिता दि.०१ डिसेंबर २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

    राज्याचे महसूल व वन विभाग अप्पर मुख्य सचिव यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनावर स.मनबिरसिंघ ग्रंथी,स.जगदीपसिंघ नंबरदार,स.दिपकसिंघ गल्लीवाले,स.बिरेंद्रसिंघ बेदी,स.बक्षीसिंघ पुजारी,स.जगजितसिंघ खालसा,स.जसपालसिंघ लांगरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या