🌟जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त🌟
नांदेड :- 16- नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार असून 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असून निर्भय व पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्येने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रमाणे लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये कलम 163 लागू होईल. याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही, सोशल मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीयामध्ये आवाहन करता येणार नाही, जाहिराती देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
💫 नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण मतदार :-
नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (303103), नांदेड उत्तर (358918), नांदेड दक्षिण (316821), नायगाव (310375), देगलूर (312237), मुखेड (307092) असे एकूण 19 लक्ष 8 हजार 546 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 9 लक्ष 78 हजार 234 तर महिला 9 लक्ष 30 हजार 158 तर 154 तृतीय पंथीचा असे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदाराचा समावेश आहे.
💫 नांदेड विधानसभा मतदार संघात एकूण मतदार :-
नांदेड विधानसभा मतदारसंघात किनवट (278665), हदगाव (299086), भोकर (303103), नांदेड उत्तर (358918), नांदेड दक्षिण (316821), लोहा (301650), नायगाव (310375), देगलूर (312237), मुखेड (307092) यामध्ये पुरुष 14 लक्ष 30 हजार 365 तर महिला 13 लाख 57 हजार 410 तर तृतीयपंथी 172 असे एकूण 27 लाख 87 हजार 947 मतदाराचा समावेश आहे.
💫3 हजार 88 केंद्र ; 5 संवेदनशील :-
जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राची संख्या एकूण ३ हजार ८८ आहे. मतदान केंद्रांचे ठिकाण 1992 आहे यामध्ये शहरी मतदान केंद्र 396 व ग्रामीण 1596 केंद्र आहेत. जिल्ह्यामध्ये 100% मतदान अधिकारी महिला असलेले, 100% मतदान अधिकारी दिव्यांग असलेले, तर 100% मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र प्रत्येकी 9 आहेत. याशिवाय जिल्ह्यात ५ संवेदनशील मतदान केंद्रही आहेत. यामध्ये किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ, मुखेड मधील कोलेगाव केंद्राचा समावेश आहे. या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासूनच पोलीस दल कार्यरत होणार आहे. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत व सुखद अनुभवाच्या ठराव्यात यासाठी 21 हजारावर कर्मचारी तैनात केले गेले असून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन या संदर्भात आधीच नियोजन केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तरतूद मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे.
💫 बुथ व्यवस्थापन महत्वाचे :-
यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.
💫 कडेकोट बंदोबस्त :-
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
💫 राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध :-
प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्याचे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.
💫 मोबाईल वापरावर बंदी :-
मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आयोगाने ज्यांना अधिकारी दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
💫 सार्वजनिक सुटी ; बाजार बंद :-
20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बुधवार 20 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे.
💫 48 तास मद्य विक्री बंद :-
कायदा सुव्यवस्थेसाठी सोमवारच्या सायंकाळी सहा वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.
💫 रेडिओ संदेश बल्क एसएमएस,सोशल मिडीया प्रसिध्दीस बंदी :-
48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी, सोशल मिडीयावरील व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
💫 पुढील बाबींवर #प्रतिबंध असणार नाही :-
घरोघरी प्रचार करता येईल तथापि ही संख्या पाच पेक्षा जास्त नसावी. दवाखानाच्या गाड्या, ॲब्युलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर, विद्युत विभाग, पोलीस निवडणूक कर्मचाऱ्यांचे व निवडणूक कर्मचाऱ्यांचे वाहन, विहित मार्गाने जाणाऱ्या बसगाड्या, शाळेला जाणारी वाहने यावर बंदी असणार नाही.
0000
💫 विधानसभानिवडणूक२०२४
लोकसभा पोटनिवडणूक नांदेड
0 टिप्पण्या