🌟जिंतूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विजय भांबळे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर🌟
परभणी (दि.२५ आक्टोंबर २०२४) :- परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिश्श्यास सोडण्यात आला असून माजी आमदार विजय भांबळे यांची या पक्षाने उमेदवारी सुध्दा निश्चित केली आहे.
जिंतूर मतदारसंघ आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षास सुटणार हे स्पष्ट होते. विशेषतः माजी आमदार भांबळे यांनाच त्या पक्षाद्वारे उमेदवारी जाहीर होणार हे ही स्पष्ट होते. परंतु, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश नागरे यांनी जिंतूर व सेलूत पत्रकार परिषदेतून आघाडीतून जिंतूर मतदारसंघ काँग्रेसच्या हिश्श्यास सुटणार आहे, असा वारंवार दावा केला. परंतु, त्या दाव्यात तथ्य आढळून आले नाही. आघाडीतील पक्षश्रेष्ठींनी ओळीनेसुध्दा त्या अनुषंगाने कोणतेही संकेत दिले नाहीत. त्याचा परिणाम नागरे हे गेल्या दोन दिवसांपासून कमालीचे हिरमुसले. आघाडीतून राष्ट्रवादीच्या हिश्श्यासच मतदारसंघ सुटणार हे खात्रीने कळाल्यानंतर नागरे यांनी अन्य पर्यायांचा विचार सुरु सुध्दा सुरु केला. त्यामुळेच जिंतूरातून भांबळे हेच उमेदवार असणार हे स्पष्ट होत होते.
दरम्यान, भांबळे यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संकेताप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासूनच या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली. पक्षाद्वारे उमेदवारी जाहीर होईलच, हे गृहीत धरुन जिंतूर व सेलूतील वाडी तांड्यांपर्यंत पोहोचण्याकरीता कसरती केल्या. ऐनकेन कारणानिमित्ताने ते या मतदारसंघात सातत्याने संपर्कात राहिले आहेत. त्यामुळेच भांबळे यांची एक फेरीसुध्दा केव्हाच पूर्ण झाली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणार्या या मतदारसंघात लढाई सोपी नाही. गेल्या निवडणूकीतसुध्दा अल्प मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. हे ओळखून भांबळे यांनी चांगलीच कंबर कसली आहे........
0 टिप्पण्या