🌟जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबरला मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा होतो🌟
वर्ल्ड मेन्टल हेल्थ डे- जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. त्यांना तणावमुक्त जीवन देऊन चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. निरामय आरोग्यावर प्रकाश टाकणारा श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी डाॅक्टर नसले तरी त्यांना असलेल्या दांडग्या अनुभवातून व्यक्त झालेला हा लेख चोखंदळ वाचकांच्या सेवेशी... संपादक.
जागतिक मानसिक आरोग्य दिन- वर्ल्ड मेन्टल हेल्थ डे दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा १९९२मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. ही दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य आणि संपर्क असलेली जागतिक मानसिक आरोग्य संस्था आहे. या दिवशी हजारो समर्थक मानसिक आजार आणि जगभरातील लोकांच्या जीवनावर होणारे त्याचे मोठे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यात येतो. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये हा दिवस मानसिक आरोग्य सप्ताहाचा भाग असतो. दि.१० ऑक्टोबर १९९२ रोजी प्रथम उप-महासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. इ.स.१९९४पर्यंत या दिवसाची सामान्य मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि जनतेला शिक्षित करणे याशिवाय कोणतीही विशिष्ट संकल्पना नव्हती. तत्कालीन महासचिव यूजीन ब्रॉडी यांच्या सूचनेनुसार सन १९९४मध्ये पहिल्यांदा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. पहिली थीम होती, "जगभरातील मानसिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारणे". जागतिक मानसिक आरोग्य दिनाला विश्व स्वास्थ्य संस्था- डब्ल्युएचओने पाठिंबा दिला आहे, जो जगभरातील आरोग्य मंत्रालये आणि नागरी समाज संस्थांशी असलेल्या मजबूत संबंधांचा वापर करून मानसिक आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता निर्माण करतो. डब्ल्यूएचओ तांत्रिक आणि संप्रेषण सामग्री विकसित करण्यात देखील मदत करते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन जगणे अवघड काम वाटते. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे आणि चिंतेने आपले जीवन जगत आहे. माणसाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक आजार टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तणाव घेतल्याने तुमची समस्या सुटणार नाही, पण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल हे समजून घ्या. जास्त ताणामुळे चिडचिड, जास्त राग, झोप न लागणे, एकटे राहणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने या गोष्टी करून बघा- १. एकटे राहू नका- ज्या व्यक्ती तणावाखाली असतात, ते एकटे राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना इतर लोकांशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. म्हणूनच आपण इतर लोकांशी संपर्क साधणे आणि त्यांच्याशी आपल्या मनाबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे आहे. कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करू या. असे केल्याने आपण स्वतःला लोकांशी जोडलेले अनुभवू. २. नकारात्मक लोकांपासून दूर राहू- जे लोक आपल्याला नकारात्मक बनवतात त्यांच्यापासून अंतर ठेवू. जर आपणास त्यांचे ऐकून तणाव वाटत असेल तर त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवू. असे केल्याने आम्हास स्वतःला सकारात्मक वाटेल. ३. चांगले मित्र बनवू- ज्यांच्याशी आपण मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करू शकू आणि आम्हाला आराम वाटेल. असे मित्र ठेवू जे आम्हाला आमच्या बोलण्यावरून जज करत नाही, मात्र आम्हाला समजून घेतात आणि आमची मदत करतात, कारण चांगले मित्र आम्हाला आवश्यक सहानुभूती देतात तसेच नैराश्याच्या वेळी योग्य वैयक्तिक सल्ला देतात. ४. योग आणि ध्यान- योग आणि ध्यानाला आपण दिनचर्येचा एक भाग बनवू. ध्यान केल्याने आपण स्वतःला तणावमुक्त अनुभवू, त्यामुळे ध्यान आणि योगासने नियमित करणे गरजेचे आहेत. हे आम्हाला तणावापासून मुक्त होण्यास आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करेल. ५. संतुलित आहार- संतुलित आहारामुळे केवळ शरीरच चांगले नाही तर दुःखी मन देखील चांगले बनते. त्यामुळे फळे, भाज्या, मांस, शेंगा, कार्बोहायड्रेट इत्यादींचा संतुलित आहार घेतल्याने मन प्रसन्न राहते. म्हणूनच त्यांचे अधिक सेवन करावे. ६. मनाला आनंद देणार्या गोष्टी करू- आम्हाला आमच्यासाठी थोडा वेळ काढता येईल अशा गोष्टी करू, ज्यामुळे मन प्रसन्न होते. जसे आम्हाला पुस्तके वाचायला आवडतात, मग पुस्तके वाचू. जर आम्हाला मित्रांशी बोलायला आवडत असेल तर मित्रांशी बोलू. जर नाचण्याने आमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर डान्स करू. आम्हाला आनंद देणार्या सर्व गोष्टी करू चला.
!! जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सर्वांना सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.
0 टिप्पण्या