🌟देशभर पसरलेल्या एक लाख पंचावन्न हजार तीनशे तेहतीस टपाल कार्यालयामार्फत चालतोर इंडिया पोस्टचा कारभार🌟
वडिलधाऱ्या मंडळींना चरणस्पर्श नमस्कार व छोट्यांना गोड गोड पापा! हे पत्राच्या शेवटी वाचायला व ऐकायला हमखास मिळणारे वाक्य आज दुर्मिळ झाले आहे. आमच्या बालपणी टपाल- पोस्टाद्वारे होणारे पत्रव्यवहार आनंददायी, प्रतिक्षा करविणारे आणि मनाला हुरहूर लावणारे होते. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्राद्वारे संदेश वहनाला घरघर लागली आहे. पत्रसंदेशाचे व्यवहार बहुअंशी बंद पडल्यामुळे उच्चविद्याविभूषित व्यक्ती सुद्धा पत्रलेखन पद्धती पार विसरून गेला आहे. पत्राचे मुख्य भाग- मायना, मजकूर, शेवट आणि पत्ता. हे जे त्यास शृंगार चढवितात तेच कोणीही सांगू शकत नाहीत, ही भाषिक साहित्याची मोठीच हानी झाली आहे. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा माहितीपूर्ण संकलित लेख जरूर वाचा... संपादक.
भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खाता- डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स यामार्फत इंडिया पोस्ट या ब्रँडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख पंचावन्न हजार तीनशे तेहतीस टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हा जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते. खरी भारतीय टपाल सेवा दि.१ ऑक्टोबर १८३७ साली सुरू झाली, म्हणून १ ऑक्टोबर हा दिवस भारतभर राष्ट्रीय टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन म्हणून साजरा होत असतो. संपूर्ण जगभरात टपाल सेवा कार्यान्वित होत्या, त्यावेळी पोस्टाने पत्र घरी येणे म्हणजे एकप्रकारे उत्साहाची भावना असायची. आपला नातेवाईक दूर ठिकाणी राहत असेल, तर तो नक्कीच टपाल- पत्र पाठवायचा आणि ख्याली खुशाली विचारायचा. अशाच टपाल सेवा विभागासाठी आणि त्यांच्या अनमोल कार्यासाठी राष्ट्रीय टपाल दिन- नॅशनल पोस्ट डे हा दिन देशभरात दरवर्षी साजरा केला जातो. तो १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय टपाल दिन सप्ताहाचे आयोजनही केले जाते. टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू असा, की टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी जनजागृती व सर्व लोकांच्या मनात टपाल सेवेप्रती आदराची भावना जागृत झाली पाहिजे. तसेच त्यांच्या कार्याप्रती सन्मान व्यक्त केला गेला पाहिजे. भारतीय टपाल सेवा ही भारतातील सरकारच्या टपाल खात्यामार्फत इंडिया पोस्ट या नावाने चालवली जाते. देशभरात पसरलेल्या १,५५,३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा पोस्टाचा कारभार हे जगातील सर्वात मोठे जाळे म्हणता येईल. आज आपण पाहतो, की देशाच्या दूरवरच्या आणि पोहोचायला अत्यंत अवघड भागातील टपालसेवा पोहोचली आहे. भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटांची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये सन १८५२ साली झाली, तर सन १८५४पर्यंत सगळीकडे एकाच प्रकारच्या तिकिटांचे प्रचलन सुरू झाले. भारतामध्ये पहिले टपाल तिकीट सन १९३१ साली छापले गेले. त्यानंतर पहिले स्वातंत्र्योत्तर तिकीट सन १९४७मध्ये निघाले आणि त्यावर भारतीय झेंडा छापण्यात आला होता.
सद्याच्या टपालव्यवस्थेची सुरुवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्या काळात सन १७७४मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सीं अंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी, असा विचार पुढे आला. त्यातूनच १ ऑक्टोबर रोजी पहिला भारतीय टपाल कायदा १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा नवीन टपाल कायदा अस्तित्वात आला. त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. इ.स.२०११पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने मागे पडून दि.१ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली. डिजिटल इंडिया या अभियानांतर्गत भारत सरकार टपाल कार्यालयांचे रूपांतर बँकांमध्ये करण्यात येत आहे. अगदी २५ ते ३०वर्षापूर्वी पर्यंत टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते. सद्या संदेशाची देवाणघेवाण फेसबुक, टि्वटर, व्हाट्सॲप आणि इतर डिजिटल ॲपच्या माध्यमातून होऊ लागली आहे, याचीच मनाला खंत वाटते! परंतु टपाल माध्यम हे कधीही न विसरणारे असे आहे. त्याला आपण तंत्रज्ञानाच्या जोडीने आधुनिक माध्यम बनवू शकतो आणि त्याचीच सद्या गरज आहे, हे सांगावेच लागू नये!
!! राष्ट्रीय टपाल दिन सप्ताह निमित्ताने समस्त भारतीय बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
- संकलक-
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली,
फक्त भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या