🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सुजाण मतदार जनता आपलं प्रतिनिधित्व कोणाला बहाल करणार ?


🌟सर्वसामान्य गोरगरीब मतदार जनता प्रस्थापित धनदांडग्या धन्नासेठांना नाकारणार की स्विकारणार ?🌟 

🌟गंगाखेड विधानसभेचे सलग तीनवेळा प्रतिनिधीत्व केलेल्या माजी आ.सिताराम घनदाटांना यावेळी तरी मतदार तारणार काय ?🌟

✍🏻 वृत्त विशेष :- चौधरी दिनेश (रणजित)

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार म्हणून सलग तीन वेळेस राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार सिताराम घनदाट यांना मागील सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत स्पष्टपणे नाकारत सुजान मतदात्यांनी तीसऱ्या क्रमांकावर टाकले होते या निवडणुकीत कारागृहात असतांना राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवलेले विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना सर्वात जास्त ८१ हजार १६९ मते मिळाल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला होता तर त्यांच्या पाठोपाठ द्वितीय क्रमांकावर राहिलेले शिवसेना उमेदवार विशाल कदम यांना निःशुल्क ६३ हजार १११ मत मिळाली होती तर या गंगाखेड विधानसभा मतदार संघाने तब्बल तीन वेळेस विश्वास व्यक्त करीत राज्य विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेल्या माजी आमदार सिताराम मामा घनदाट यांना ५२ हजार २४७ मत मिळाल्याने ते तृतीय क्रमांकांवर फेकल्या गेले होते तर यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार करुणाबाई कुंडगीर यांना २८ हजार ८३७ तर अपक्ष उमेदवार संतोष मुरकुटे यांना २२ हजार ९५५ मतं मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांना केवळ ०८ हजार २०४ मतं मिळाल्याने या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या मतदारसंघातील मतदात्यांनी स्पष्टपणे नाकारल्याचे देखील यावेळी दिसून आले होते. 

परभणी जिल्ह्यातील संधीसाधू तत्वभ्रष्ट अकार्यक्षम लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेची उघड साक्ष देणारा सर्वात मागास व अविकसित मतदार संघ म्हणून ज्या मतदारसंघाची ओळख आहे असा सर्वसामान्य गोरगरीब मतदार आणी धनदांडग्या धन्नासेठांचा एकमेव विधानसभा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात पुर्णा-पालम व गंगाखेड या तीन तालुक्यांचा समावेश असून यातील पुर्णा तालुका हा निजाम/इंग्रज राजवटीत देखील सर्वात सधन तालुका म्हणून ओळखला जात होता कृषी क्षेत्र,औद्योगिक क्षेत्र,व्यापार क्षेत्र,शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या व दक्षिण मध्य रेल्वे विभागांतील भौगोलिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे व मराठवाड्यातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शन मुळे नावाजलेल्या या पुर्णा तालुक्याला परभणी जिल्ह्यातील तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधींधी आपल्या वरकमाईचे साधन समजून वेळोवेळी दुय्यम दर्जा दिल्याने या तालुक्याच्या विकासाला अक्षरशः खीळ लागली असल्याचे निदर्शनास येत असुन गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सर्वार्थाने सतत मोठ्या भावाची भुमिका पार पाडणाऱ्या या तालुक्याला शेवटी परभणी/गंगाखेड/मुंबईतील धन्नासेठांचे मांडलीकत्व स्विकारण्या शिवाय पर्याय राहिलेला नाही असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी देखील पुर्णा तालुक्यातून शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत मागील विधानसभा निवडणुकीत द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या विशाल कदम यांना यावेळी तरी या मतदारसंघातील मतदार जनता राज्याच्या विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे व तीन वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार सिताराम घनदाट यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवारांना जोरदार टक्कर दिलेल्या विशाल कदम यांना शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी देऊन प्रस्थापितांपुढे आव्हान उभे केल्याचे बोलले जात असले तरी पुर्णा तालुक्यातील मतदार जनता त्यांना कितपत साथ देते यावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणुकांतून सलग तीन वेळेस अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून निवडून आलेल्या माजी आमदार सिताराम घनदाट यांनी यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टीकडून उमेदवारी मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु सदरील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाला सोडल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विशाल कदम यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे माजी आमदार सिताराम घनदाट यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत अधिकृत रित्या प्रवेश करीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडून घेतली त्यामुळे या मतदारसंघातील तमाम वंचित बहुजनांच्या मतदाणावर दारोमदार असलेल्या महाविकास आघाडी/महायुतीसह सर्वपक्षीय उमेदवारांपुढे प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याचे निदर्शनास येत असून प्रत्येक निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पुर्णा-पालम-गंगाखेड तालुक्यातील विकासाला सोयीस्कररित्या मुठमाती देऊन जातीपात/धर्मासह पैशाची बेरीज-वजाबाकी लावणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याने उमेदवारी मिळवल्याचा आनंद कमी आणि निवडणूक जिंकणार की नाही याची चिंताच मात्र प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्यावर सुरुवातीपासून पाहावयास मिळत असून सलग तीन वेळेस गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार सिताराम घनदाट यांना यावेळी तरी मतदार तारणार काय ? असा एकीकडे उपस्थित होत असतांना मात्र मागील विधानसभा निवडणुकीत कारागृहात असतांना देखील नवख्या राष्ट्रीय समाज पक्षांकडून निवडणूक लढवून 'जो जीता वही सिकंदर' म्हणल्याप्रमाणे बहुमताने निवडून आलेले आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यावेळी तर 'खुल्ला शेर' बनून प्रत्येक भेटीगाठी छोट्या मोठ्या सभाही गाजवत असल्याने विरोधकांना धडकी भरत असल्याचे बोलले जात आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या