🌟'वुई सपोर्ट सीईओ वाघमारे' ग्रुपचे आंदोलन तात्पुरते स्थगित🌟
फुलचंद भगत
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची बदली करू नये यासाठी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या वाशिम जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांना सायंकाळी दिलासा मिळाल्याने त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
मागील काही दिवसापासून वाशिम जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या या हेकेखोरपणे पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत वाघमारे यांना पाठिंबा दर्शविला होता. यासाठी समाज माध्यमातून 'वुई सपोर्ट सीईओ वाघमारे' असे कॅम्पेनिंग चालवले गेले. या माध्यमातून गावागावातील सामान्य गरीब, शेतमजूर, शेतकरी आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सीईओ वाघमारे यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. सीईओ वाघमारे यांच्या विरोधात कर्मचारी संघटनांचा विरोध आणि दुसरीकडे सीईओ यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा, यामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता.कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिक्षक व ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी 'वुई सपोर्ट सीईओ' या ग्रुपच्या माध्यमातून संघटित झालेल्या तळागाळातील सामान्य लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी सहभाग घेऊन सीईओ वाघमारे यांचे समर्थन केले. कर्मचारी संघटनेकडे संख्या बळ आणि आर्थिक बळ मोठे असूनही वाशिम च्या सामान्य जनतेने त्यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडले. धरणे आंदोलनकर्त्यांना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 'सीईओ वाघमारे यांची बदली करण्यात येणार नाही' असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या