🌟'वुई सपोर्ट सीईओ' ग्रुपच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन🌟
फुलचंद भगत
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या समर्थनार्थ 'वुई सपोर्ट सीईओ' हा नारा देत वाशिम जिल्ह्यातील जवळपास पन्नासाच्या वर सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी तसेच काही सरपंच व लोकप्रतिनिधींनी येऊन चळवळ उभी केली आहे या माध्यमातून तयार झालेल्या 'वुई सपोर्ट सीईओ' ग्रुपच्या वतीने दि.03 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती 'वुई सपोर्ट सीईओ ग्रुप' च्या वतीने देण्यात आली.
निवेदनानुसार, फेब्रुवारी 2024 पासून जि. प. वाशिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर वैभव वाघमारे हे रुजू झाले आणि अल्पावधीतच लोकाभिमूख आणि पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकास कामांवर छाप पाडली आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्ह्याला लाभले आहेत मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि. प. चा कारभार वैभव वाघमारे यांनी योग्य प्रकारे हाताळल्यामुळे गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात अमुलाग्र बदल घडून आले आहेत चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे ते कौतुक करत आहेत. तर कामचुकारांना वठणीवर आणत आहेत.
त्यांच्या या कामगिरीवर जिल्ह्यातील समस्त जनता समाधानी असताना जि. प. अंतर्गत असणाऱ्या काही कर्मचारी संघटनांनी वैभव वाघमारे यांची बदली करण्याची मागणी केली. आणि दि. 1 ऑक्टोंबर पासून त्यांनी सामूहिक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची कामे खोळंबली आहेत. जनतेला वेठीस धरून कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला जनतेने धडा शिकविण्याचे ठरविले असून या माध्यमातून ' वुई सपोर्ट सीईओ' या टॅगलाईन खाली लोक चळवळ उभी झाली आहे. यामाध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. सोबतच मागणीची पूर्तता न झाल्यास जिल्ह्यात गाव पातळीवर विविध मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा वुई सपोर्ट ग्रुपच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जनतेने मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वुई सपोर्ट सीईओ ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या