🌟कवी आबासाहेब पाटील लिखित 'घामाची ओल धरून' या कविता संग्रहाचा माधुरी चौधरी वाघुळदे यांनी घेतलेला आढावा🌟
कवितांचे पिक चौफेर फोफावत असतांना काही बोटांवर मोजण्याइतकेच संग्रह काळजाला हात घालतात.त्यापैकीच एक म्हणजे सन्माननीय आबासाहेब पाटील यांचा ' घामाची ओल धरून' हा संग्रह होय.चांगली कविता वाचकांच्या मनोविश्वावर कायमस्वरूपी गारूड घालते.अनुभवविश्वात हलकेच प्रवेश करून मनावर खोल ठसा उमटवते.
वाचकाला चिंतन,मनन करायला भाग पाडते. कवितेतील शब्द सामर्थ्याबरोबरच आशयसंपन्नता आपल्याला त्यावर भाष्य करण्यास प्रेरीत करते.अशाच या कविता शब्दसंपन्न व आशयघन, वैविध्यपूर्ण, चिंतनशील कवितेची अनुभूती वाचकाला देतात.वेदनेची उसवण करता करता ही कविता मार्मिक टोलेबाजी पण करताना दिसते.भवताल टिपताना भवतालातील अणूरेणू समजून उमजून घेत त्यावर परखड भाष्य करताना दिसते तर भावभावनांचे अलवार तरंग ही तेवढ्याच ताकदीने मांडते.कवी नेमकं, चिंतनशील व वास्तववादी लिहितात.समकालीन वेदनांचा लेखाजोखा रेखाटतात.म्हणून त्यांची कविता आधुनिकतेशी सहजपणे नाते जोडताना दिसते. त्यांच्या काव्यलेखनात भाव,अर्थ आणि विचार संयत सभ्य भाषेत व सहजपणे व्यक्त होतात.कोठेही भंपकपणा व आक्रस्ताळेपणा नाही.कुठेकुठे विद्रोह डोकावत असला तरी त्या विद्रोहालाही अलवार झालर आहे.विषयाचा आवाका जेवढा मोठा तेवढीच आशयाची खोली आहे.
घामाची ओल धरून हा संग्रह कवितेला भिडायला
शिकवतो.या कवितेचा आवाका मोठा असून यातील
भाषा सौंदर्य वाचकाच्या मनावर राज्य करते.
कवीची कल्पनाशक्ती अफाट आहे.कवी म्हणतो की
पिंडदान न मिळालेले आत्मे त्यांच्याकडे दुःख हलकं
करणा-या कवितेच्या ओळी मागतात.ते म्हणतात
पिंडदान न मिळालेल्या आत्म्यांना
माहिती हवी आहे
बेगडी आसवांच्या पखाली वाहणाऱ्या डोळ्यांबद्दलची
त्यांना जाणून घ्यायचं आहे
मदतीसाठी पुढं आलेल्या
हातामागचा स्वार्थ
असतो किती धारदार
अशा कविता वाचकांच्या विचारशक्तीचा कस लावतात.सामाजिक संवेदना थेट मांडतात.या कवितांमधील समाजवास्तव परिवर्तनाची पारंपारिक वाट प्रशस्त करते.उणेपणावर नेमकेपणाने बोट ठेवते.
द रिमेक ऑफ रामायणा,आग लावण्याची कला,तडजोडीच्या झुल्यावर,दृष्टांत,थोडं अवघड आहे, मग्रुरी,समजूतशास्र,हलगी, आधार कार्ड, मरणाची चंचल वेळ अशा कविता संवेदनशील मनाला अस्वस्थ करतात.या अशा कविता वाचकाला भोवंडून टाकतात.या संग्रहातील शब्दांचे निखारे अस्वस्थतेची परिसिमा गाठतात.प्रस्थापित व्यवस्था व सामाजिक स्थितीवर आग ओततात.
या संग्रहात स्त्रीवादी कविता तशा कमी असल्या तरी त्यांची उंची व गहनता फार आहे. तडजोडीच्या झुल्यावर या कवितेमध्ये संसारात रमलेली स्री किती काटकसरीने संसार करते याचे उत्तम उदाहरण आहे. परिस्थितीने आकसलेल्या तिच्या हातांना मुळात अंगचीच चव असते म्हणूनच अर्धा चमचा तेलात ही ती मसालेदार तडका देऊ शकते .कपडे फाटण्याआधी किंवा उसवण्या आधीच तिचा सुईमध्ये दोरा ओवून ठेवलेला असतो.कवी म्हणतात,
पिठाच्या अर्ध्याच गोळ्यात
थापते ती
पूर्ण गोल भाकरी
अपु-या सरपणासोबत
थोडी स्वतःलाही सारते चुलीत
अशा भावनाशील कविता कुठून येतात कुणास ठाऊक. याबाबतीत तर कवीसुध्दा संभ्रमात आहे कुठून येथे कविता करपलेल्या मातीतून भरलेल्या डोळ्यातून तडफडणा-या रातीतून तलवारीच्या पात्यातून कुणास ठाऊक पण कविता मात्र फुलत येते कळत नकळत फाटलेल्या काळजातून भळभळते. कवितेचा मूळ शोधण्यात कवी मात्र यशस्वी झाला हे नक्की.
या कविता कष्टकरींच्या आहेत.कष्टकरी वर्गाची एक विश्ववेदना यामध्ये आहे.घामाने लदबदलेल्या कष्टकरी शेतक-यांचा दुस्वास करणा-या ,स्वतःला आधुनिक समजणा-या वेगळ्याच जगाचा कवी काळीज आतून जळतय या कवितेत समाचार घेतात.घामात किटाणू असतात असे म्हणणारे घामाने पिकवलेले आंबे,ऊस, ज्वारी सगळंच कसं चवीने खातात.तेव्हा कुठे जातात हे किटाणू असा खडा सवाल कवी करतात.
घामाची ओल धरून ठेवलेल्या मातीतच
खोल खोल उतरलं की राव
लालभडक लांबलचक गाजर
मधाची साठवत गोडी
घामाचा हात लागला म्हणून
कुणाला खारट लागल्या का आंब्याच्या फोडी ?
सामाजिक बांधिलकी जपत निखळ, तरल संवेदना या कवितांमधून मांडल्या गेल्या आहेत.या कविता वाड़मयमुल्य जोपासणा-या असून आत्मभानापासून आत्मशोधाकडे घेऊन जाणा-या आहेत.ऑक्सिजन सारखी कविता निर्धन आईवडीलांची हतबलता रेखाटते.कमी पैशातल्या कमी फॅटच्या दुधावर थोपवलेले कुपोषण व त्यातील हतबलता मेंदूपर्यंत पोहचणार नाही ही काळजी वाचकांना आतून हलवते.
द रिमेक ऑफ रामायणा,बाकी तुझी मर्जी,आय एम साॅरी, मंबाजीला आस,ज्ञानदेवा,आबा बोले पांडुरंगा, यशोदे यासारख्या कविता वेगळ्या धाटणीने जातात. कवी अगदीच नास्तिक आहे असे नाही पण मग ईश्वर आहे तर एवढे प्रश्न आहेत ते तो सोडवत का नाही या जाणिवेने कवीला ग्रासले आहे.अशा कविता चिंतन , मनन करायला भाग पाडतात.आत्मभान जागवतात. या आदीशक्तीच्या ओढीने अंतरगात विलक्षग आनंद, उत्साह, प्रसन्नता व चैतन्य निर्माण व्हायला हवे पण कवी संसारच्या रहाटगाडग्यात अंतर्बाह्य व्यापला आहे.म्हणूनच तो परमेश्वराला सांगतो,
माझ्या वेदनेने झाला
काळाकुट्ट पांडुरंग
इंद्रायणी बुडविते
माझ्या सत्वाचा अभंग
अशा ओळीतून कवी आपण आस्तिक असल्याचे मान्य करतात.पण त्याचे अस्तित्व मात्र त्याला जाणवत नाही.परिस्थितीने पिचलेल्या मनाला सुखाचा गारवा जर मिळत नसेल तर श्रध्देचा उपयोग तरी काय? ज्ञानदेवा कवितेत कवी माऊलींना विचारतो , तुम्ही भिंत चालवली पण माझ्या बापाने चार भिंतींचे अख्खे घर हयातभर चालवले.ज्ञानीयाचे राजे तुम्ही कुठे आणि माझा बाप कुठे ?
ज्ञानदेवा
बापानं लिहून ठेवले नाहीत
त्याच्या रक्तातच कढय होते अभंग
अविरत कष्टाच्या मातीत
झिरपत राहिल्या ओव्या.....
आबा बोले पांडुरंगा,आत उसळला दंगा....कारण माझ्यातील तुकाराम जाम झाला आहे.माझा मुलगा ज्ञानदेव असला तरी त्याच्यामागे डोनेशनचे भेव आहे. बायको सखुबाई सोसण्यात कुठेही कमी पडत नाही. ती संसाराच्या रहाटगाडग्यात देवाधर्माला शिव्या घालत असली तरी तिच्या उरात मात्र गोडवा आहे.
परिस्थितीशी दोन हात करताना काळजावर चाबकाचे फटके अन् खांद्यावर प्रपंचाचा जू ओढत असताना कवीला आपण माणूस असल्याचा भास होतो.शिंग आणि शेपूट नसलेला पण आईच जाणीव करून देते की तो बायकोचा बैल आहे.मग मात्र कवीला जाणीव होते सुजलेल्या खांद्याची अन् नाकपुडीत रूतलेल्या वेसणाची.... शेवटी एक प्राणीच तो....आईने बैल ठरवलेला आणि बायकोने सात जन्मासाठी गोठ्यात बांधलेला.
सामाजिक बांधिलकी जोपासणा-या निखळ संवेदना या कवितांमधून व्यक्त होतात.यामधील भाषा सौंदर्य, कलात्म सौंदर्य, वैचारिक प्रगल्भता,आत्मक्लेशाकडून विश्ववेदनेकडे जाणारा प्रवास उच्च साहित्यिक मुल्य जोपासतो.पगारानं रडायला माणसं मिळणा-या या काळात कवीला स्वतःचा वर्तमान सापडत नाही किंवा वर्तमानच त्याच्या मापाचा नाही या संभ्रमात तो वावरतो.तरीही कवी आपला आशावाद सोडत नाही. आपल दुःख मोनालिसाशी वाटून घेताना कवी म्हणतात.
माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत
अशीच हसत राहा मोनालिसा !
तुला हसताना पाहून
मलाही बरं वाटतं
तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं;
कर्नाटकातील कवी आबा पाटील हे मराठीचा समृद्ध वारसा जपणारे एक महत्वाचे कवी आहेत.त्यांचे लिखाण समृध्द व सखोल आहे.त्याच्या हातून अजून बरीच सेवा मायमराठीच्या चरणाशी व्हायची आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
संग्रह - घामाची ओल धरून
कवी आबासाहेब पाटील
प्रकाशन - शब्द शिवार
किंमत- २०० रू
माधुरी चौधरी वाघुळदे
छ.संभाजीनगर
९४२१८६०८७३
1 टिप्पण्या
धन्यवाद सर
उत्तर द्याहटवा