🌟सन १९८० पासून जागतिक पर्यटन दिन अर्थात वर्ल्ड टुरिझम डे याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली🌟
आपल्यातील अनेक जण फिरण्याचे प्लॅनिंग करण्यास सुरुवात करतात. "हिरवा निसर्ग, गर्द झाडी, निळाशार समुद्र आणि मस्त भटकंती..! काय झाडी ? काय डोंगर ? काय निळा निळा सागर ? पर्यटनातून आपण सगळं काही न्याहाळू शकतो, इट्स ओके..!!" हे शब्द हटकून कानावर पडतात. वर्षभरातून एकदा तरी माथेरान, महाबळेश्वर, गोवा ते थेट लडाखपर्यंतचा एखादा प्लॅन हा ठरलेला असतो. आज २७ सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन. पर्यटनातून काहीतरी मानव विकास साध्य करता यावा, अशी दरवर्षीची संकल्पना आहे. ही संकल्पना घेऊनच पर्यटन दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या जीवघेण्या काळात पर्यटन क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला आहे. ही परिस्थिती यंदा लवकरात लवकर सुधारू लागली आहे. सर्वच पर्यटन क्षेत्रे सुरू व्हावीत, असे अनेक पर्यटकांचे म्हणणे आहे. यावर प्रकाश टाकणारा श्री कृ. गो. निकोडे गुरूजींचा हा लेख... संपादक.
आज २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सन १९८० पासून जागतिक पर्यटन दिन अर्थात वर्ल्ड टुरिझम डे याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना सन १९७०मध्ये याच दिवशी झाली होती. गत सन २०१८मध्ये पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन हे मुख्य उद्दिष्ट ठेवून हा दिवस साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले. तर वर्षभर पर्यटनदिनासाठीचा विषय होता तो म्हणजे- पर्यटन आणि नोकऱ्या: सर्वांसाठी चांगले भविष्य! ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे. अशांना पर्यटन क्षेत्रात कारकीर्द करणे सहज शक्य झाले आहे. आवडीची कारकीर्द पूर्ण झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्तसंचार करणे आता सोपे झाले आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेश गमन करण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वर्षभरात पर्यटन या क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ होते. पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. अनेक परदेशी पर्यटन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. सार्वजनिक आणि खाजगी स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने कारकीर्दच्या या क्षेत्राचा घेतलेला आढावा-
ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात पदवीसाठी बारावी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी, तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक नितीनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी. निवास, वाहतूक, अन्न, समारंभ, साहसी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. आपल्या आवडीनिवडीनुसार यातील अनेक विभागात काम करता येईल.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पर्यटन विभागात नोकरीच्या संधी मिळतात. पर्यटन संचालनालय याच्या माध्यमातूनही अनेक पदे भरली जातात. सरकारी नोकरीत येण्यासाठी मात्र या विषयातील पदवीप्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच अनेक परदेशी कंपन्यात संधीही आहेत. अनेक विमानसेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. खाजगी समूहात व्यवस्थापन आणि आदी बाबींसाठी उत्तम वेतनही मिळते. आरक्षण, विपणन, विक्री, नियोजन व मार्गदर्शन यासाठी अनेक जागा भरल्या जातात. मार्गदर्शक हा उपलब्ध पर्यटनसंबंधी जागा आणि तिथे मिळणाऱ्या सेवांची तपशीलवार माहिती देण्याचे काम करतो. त्याच्या सहकार्यामुळे प्रवाशांना योग्य नियोजन करण्यास मदत होते. पर्यटन मंत्रालय गाईडला मान्यता देते. प्रादेशिक, राज्य आणि स्थानिक असे तीन प्रकार त्यात पडतात. हा परवान्याचे दर दोन वर्षांनी नुतनीकरण करता येते. स्थळांची सविस्तर आणि इत्यंभूत माहिती देणे आणि सांस्कृतिक परंपरा आदीची माहिती देण्याचे काम गाईड करत असतो. त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असायला हवे. कारण तो प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन मार्गदर्शन करत असतो. एकंदरीत गाईड हा महत्त्वाचा दुवा असतो. टूर ऑपरेटर्स हे प्रवासाचे संपूर्ण नियोजन करतात. टूर गाईड म्हणून अनुभव आल्यानंतर या पदावर काम करता येते. ट्रॅव्हल एजन्सी यांचे अनेक लोक ग्राहकांना एजन्सीशी जोडतात. आता ऑनलाइनही ग्राहक जोडता येतात. ग्राहकांशी संवाद साधून अनेक प्लॅन ते देत असतात आणि ग्राहकांना कंपनीशी संपर्क करून देतात. पर्यटन आणि हॉटेल क्षेत्र या दोन्हींचा संबंध अनन्यसाधारण आहे. प्रवासात मुक्कामाची सोय करण्याचे काम एकमेकांच्या सहाय्याने केले जाते. यावर आकर्षक सवलती देऊन ग्राहक मिळवण्याकडे कल असतो. सद्या जवळजवळ एक लाख कुशल मनुष्यबळाची गरज या व्यवसायाला आहे. विमान कंपन्यासाठी काम करणे, ही वेगळा आनंद देणारी संधी असते. इतर व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्याने संधी मिळते. त्याचबरोबर आकर्षक वेतनही दिले जाते.
पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारू शकते. नैसर्गिक सौदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी जावं म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्वाचे ठरतात. सिंगापूर सारख्या काही देशांची आर्थिक स्थिती ही फक्त पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असते. कारण पर्यटनामुळे कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणून पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेटी देणे व स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेणे, याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.
!! विश्व पर्यटन दिनाच्या सप्ताहभर समस्त भावाबहिणींना खुप खुप समृद्धीमय हार्दिक शुभेच्छा !!
श्री. कॄ. गो. निकोडे गुरुजी.
मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे, गडचिरोली.
तह. जि. गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.
0 टिप्पण्या