🌟पात्रता नसतांना मिळालेली सत्तास्थाने व वाममार्गाने चालत आलेल्या अघोरी संपत्तीने माणसातला माणूस हिरावून नेला🌟
✍🏻लेखक :- संजय एम.देशमुख (निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार,
अकोला (विदर्भ) मोबा.क्र.९८८१३०४५४६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काळ बदलला,माणूस बदलला...अमर्याद अधिकार आणि पात्रता नसतांना मिळालेली सत्तास्थाने व वाममार्गाने चालत आलेल्या अघोरी संपत्तीने माणसातला माणूस हिरावून नेला,माणूस मानवी जीवनमुल्ल्यांना आणि भावना,स्नेहबंधांना पारखा झाला...! .वाढत्या अनैतिक ऐश्वर्याने युवापीढी बिघडवली.मिळालेल्या राजसिंहासनांनी उन्मत्तपणा वाढविला.ना कायद्याचे भय राहिले ना संविधानाचा आदर...! कायद्याचे अनेक रक्षक स्वत:चे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी अप्रामाणिकता अंगीकारून कायद्याचे भक्षक बनले.कायदे हे फक्त आता सर्वसामान्न्यांना,गरीबांना दंडीत करण्याचे हत्त्यार आणि धनदांगड्यांसाठी मऊ गालीचे ठरलेले आहेत,असे विदारक चित्र आता निर्माण झाले आहे.या दृश्यातील कर्तव्यहिन अपप्रवृत्ती अनाचाऱ्यांच्या राजमार्गातील सेवेकरी म्हणून हुजरेगीरी करणाऱ्या सरदार बनलेल्या आहेत.अशी चिंतनिय,दयनिय आणि लोकशाहीचे धिंडवडे काढून संविधानाची बेअब्रू करणारी परिस्थिती सध्या या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे.याबाबत कुणाचेच दुमत असू नये.
"ज्याच्या हाती ससा तोच पारधी,नव्हे तोच गारदी" असे म्हणण्याचे स्मरण देत राहणारी ही बिकट परिस्थिती या महाराष्ट्राच्या वाट्याला ठाण मांडून बसलेली आहे.समाज चिंतेत आहे.लोकशाहीचे धिंडवडे आणि कायद्यांचे दुरूपयोग करणारे अनेकजण पाहून आता आपले रक्षक कोण या चिंतेने समानमने ग्रासलेली आहेत.त्यामुळे "कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र माझा" असे हुंकार अस्वस्थ समाजमनांमधून आज बाहेर पडत आहेत. हे सर्व पाहून ज्यांना सत्तेत बसवले किंवा विरोधी पक्ष म्हणून नियंत्रणासाठी पाठवले,त्यांना स्वार्थी,मतलबी म्हणावे की महान त्यागी,आदर्शांचे अवमुल्यन करणारे बिघडलेले राजकारणी म्हणावे की मानवतावादी समाजशील हेच आज समजेनासं झालेलं आहे.
या राज्यात कायद्यांचे हात इतके आखूड आहेत का ? की सत्तेच्या खुर्चित बसलेल्या राजकीय नेत्यांपर्यंत ते पोहचू शकत नाहीत.हे सत्त्य फक्त सत्ताधाऱ्यांसाठी आणि सारे गुन्हेगार फक्त विरोधी पक्ष आणि सर्वसामान्न्यांमध्येच सक्रीय आहेत का ? कायद्यांची किंमत आज एवढी कमी झालेली आहे का,की मिळालेली सत्ता हे स्वत:चे खाजगी कुरण समजले जाते.नेतेगीरी करणाऱ्यांच्या त्या बिघडलेल्या मुलांनीही गरज भासेल तेव्हा त्यांचेशी खेळावं.त्या कायद्यांचे खुळखुळे बनवून त्यांच्या रक्षकांसमोरच खेळण्याप्रमाणे वाजवत रहावं ? या झपाट्याने रसातळाकडे जाणाऱ्या परिस्थितीवर समाजाने चिंतन केलं पाहिजे..! आज महिलांवरील लैंगिक अत्त्याचार,त्यांच्या होणाऱ्या हत्त्या,मुली बाळींच्या लुटल्या जाणाऱ्या अब्रू,आर्थिक गुन्हे,हिंसाचार ,वाममार्गाने मालमत्ता हिसकण्याचे प्रकार,खंडण्या आणि आर्थिक लाभा़ंसाठी होणारी अपहरणे हे नित्याचे स्वस्त खेळ होऊन बसलेले आहेत.
मात्र सध्या गाजत असलेली भयानक क्रूर प्रकरणे म्हणजे दारूच्या नशेमध्ये गाड्यांनी उडवून निरपराध्यांची हिरावली जाणारी आयुष्ये..! किती क्लेशदायी,आणि क्रूरतेने भरलेल्या ह्या विदारक घटना आहेत...या सर्व थैमानांमधील ही सगळी धनदांगड्यांची कारटी आणि राजकीय नेत्यांची बिघडलेली मुले,नातेवाईक तथा त्यांची सेवा चाकरी करणारे हूजरेगीर निष्ठावंत म्हणून आढळलेली आहेत.काय चाललंय हे ? सगळं चक्रच झपाट्याने बदलत चाललंय....लोकशाहीत प्रतिष्ठापित झालेल्या संविधानातील मार्गदर्शक,स़ंरक्षक तत्वानुसार समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क, विधायक न्यायाचा उल्लेख आहे.मग श्रीमंतांना किंवा सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देऊन तिथे कायद्यांची आणि त्यांच्या रक्षकांचीही शरणागती दिसण्याचा हा लोकशाहीतील दैवदुर्विलासी लाजीरवाणा खेळ कसा काय चालू आहे? जिथे महाराष्ट्राचा ईतिहास बदलण्याची विधाने केली जातात.छत्रपतींचे समाधीस्थळ महात्मा फुले यांनी शोधले म्हणण्याऐवजी लोकमान्य टिळकांनी शोधल्याचं हेतुपुरस्सर सांगीतले जाते,त्यांचेकडून काय अपेक्षा ठेवाव्यात ?
या सर्व घटनांप्रमाणेच गेल्या ६-८ महिण्यात गाजत असलेल्या हिट अॕन्ड रनच्या गंभीर अपघातांनी पुण्या मु़ंबईत अनेक निरपराधा़चे बळी घेतले. जनावरा़ंप्रमाणे अमानविय पध्दतीने कातडी सोलत घासत नेले.त्या आर्त किंकाळ्यांनीही त्या हरामी बेवड्यांच्या नशा उतरल्या नाहीत.ज्या निरपराधांचे जीव गेले त्यांच्या कुटूंबांवर आघात झाले.परंतू त्यानंतरच्या चौकशी प्रकरणात मात्र सत्ता आणि वाममार्गातील संपत्तीचा वापर करून ड्रायव्हरांच्या अदलाबदली,मुख्य आरोपींना वैद्यकीय चाचण्यातून वगळणे, असे खोटे सोपस्कार करून कायद्यांच्या चौकटीतून त्यांना संरक्षित करण्याचे खोटे कारनामे होत असल्याचे आरोप झालेले आहेत.ते नागपूरच्या अपघाताबाबतही होत आहेत.यातील हत्त्याऱ्यांना निरपराध सिध्द करण्यासाठी काही पोलिसांची कर्तव्याशी होणारी प्रतारणा करून आरोपींना संरक्षण ही समाजस्वास्थ आणि आघात झालेल्या कुटूंबा़ंचाच घात करण्याचे क्रूर प्रकार आहेत.त्यांना न्यायापासून वंचित ठेवण्याची पापे ह्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील प्रभावी घटकांकडून घडत आहेत,ही संविधानांवर आघात करणारी अत्यंत गंभीर आणि चिंतनिय बाब आहे." माणसा माणसा कधी होशिल रे माणूस तू..?
परवा नागपूरात सुध्दा महाराष्ट्रातील बलाढय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संकेत बावनकुळे या पूत्रानेही असाच अपघात आणि तो सुध्दा दारूच्याच नशेतून घडवून आणल्याची माहिती आहे.आतापर्यंतच्या अपघातातील अनेक चौकशांचे मार्ग सुध्दा भाजप नेत्यांच्या घरापर्यंतच जाऊन पोहचलेले आहेत.आत्ताचा अपघात तर त्या राजमहालाच्या छत्रछायेतील लाडक्या सुपूत्रांच्याच गाडीने घडविला आहे.आता गाडी ते चालवत नव्हते अशी माहिती नंतर बाहेर आलेली आहे,आणि ती येणार हे सर्वांना अगोदरच अभिप्रेत असते.परंतू गाडीत बसलेली मंडळी बार- रेस्टॉरन्टमधून खाऊन आणि तर्रर पिऊन बाहेर पडलेली होती हे गाडीत सापडलेल्या हॉटेल बिलावरून समजते आहे.या प्रकरणात सुध्दा गाडी मालक आरोपी नाही.ईतर दोघांची न चुकता केली तशी प्रदेशाध्यक्षांचे चिरंजीव म्हणून त्यांच्या वैद्यकीय चाचणीची सुध्दा आवश्यकता पोलिस प्रशासनाला वाटली नाही. म्हणजे येथील कायदे फक्त सर्वसामान्न्यांना आणि गरीबांना दंडीत करण्यासाठीच आहेत का? सत्ताधारी किंवा श्रीमंतांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी किंवा संबंधितांसाठी ते वापरता येणार नाहीत,असं काही तरी खास संरक्षक कवच या देशातील सत्ताधाऱ्यांना आणि अनैतिक धनदांगड्यांना या लोकशाहीत बहाल झालेलं आहे की काय? मग असं जर असेल तर येथे कायद्याचे राज्य आहे,येथील लोकशाहीत संविधानिक तत्वानुसार सर्वाना समान कायदा आणि समान न्याय आहे असं मोजमाप कोणत्या फुटपट्टीने करावं हे देशातील राजकारण्यांनी येथील मतदारांना समजाऊन सांगीतलं पाहिजे.
साधारण माणसाच्या हातून येथे थोडी जरी चुक झाली तरी तो व्यथित होतो,त्याला बिचाऱ्याला वेदना होतात. परंतू काही निगरगठ्ठ राजकीय नेते आणि त्यांच्या आश्रितांनी मात्र येथील संविधानिक,नैतिक आणि राजनैतिक आदर्शांचा वेदनादायी पालापाचोळा केलेला आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या आणि अनैतिकतेच्या कर्करोगाने या देशात थैमान घातले आहे.येथील नेतेच बिघडलेले आहेत त्यामुळे आमचं कोणी काहीच बिघडवू शकत नाही अशा उन्मत्तपणातून अपप्रवृत्ती आणि प्रशासनातील भ्रष्ट मग्रूर प्रवृत्तींकडून समाजस्वास्थ,लोकशाही आणि संविधानावर आक्रमण केले जात आहे.हे समाजाला रसातळाला नेणारे अक्षम्य पाप वर्तमानात आगीच्या वणव्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात बोकाळलेलं आहे.यासाठी शक्तिशाली जन आंदोलनाशिवाय या अनागोंदीचे,अराजकतेचे उच्चाटन होणे नाही...!
0 टिप्पण्या