🌟मराठीतील लाडके नाटककार,कवी,अभिनेते,दिग्दर्शक बाळकृष्ण हरी कोल्हटकर ऊर्फ बाळ कोल्हटकर यांची आज जयंती🌟
सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या बाळ कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या. बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. त्यांची बोधप्रद माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी येथे देण्याचा प्रयत्न केला आहे... संपादक.
मराठीतील लाडके नाटककार,कवी,अभिनेते,दिग्दर्शक बाळकृष्ण हरी कोल्हटकर ऊर्फ बाळ कोल्हटकर यांची आज जयंती आहे. उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका साकारणारे बाळ कोल्हटकर म्हणजे नाट्यसृष्टीतला एक मानबिंदू तथा चमकता तारा होते. त्यांचा जन्म दि.२५ सप्टेंबर १९२६ रोजी सातारा येथे झाला होता. त्यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले होते. त्यांना लहानपणापासूनच नाटकांची अतिशय आवड होती. त्याचबरोबर लेखनाचाही तेवढाच छंद जडला होता. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या अप्रतिम लेखनाला सुरुवात झाली. म्हणून पुढे महान असे महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाट्यसृष्टीतला एक मानबिंदू ठरले. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्यांनी जोहार हे आपले पहिलेवहिले नाटक लिहिले. त्यांची बरीच नाटके अतिशय लोकप्रिय झाली. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. बाळकृष्ण हरी कोल्हटकर यांनी गीतकार म्हणून लिहिलेली गाणी अशी- आई तुझी आठवण येते, आली दिवाळी दिवाळी, उठि उठि गोपाला, गजाननाला वंदन करूनी, तू जपून टाक पाऊल जरा, निघाले आज तिकडच्या, हा शब्द नवा, ऋणानुबंधांच्या जिथून आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागतो.
तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत, थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. नाटक वेळेवर सुरु करणे आणि ते प्रामाणिकपणे सादर करणे शिवाय ते लोकप्रिय करणे त्याकाळात अवघड होते. बर्याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती, तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. दुरितांचे तिमिर जावो या नाटकांचे पंधराशे प्रयोग, वाहतो ही दुर्वाची जुडी या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर एखाद्यांचे नशीब या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार नावाचे नाटक लिहिले. सन १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पैशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले. बाळ कोल्हटकर यांचे दि.३० जून १९९४ रोजी दुःखद निधन झाले.
!! बाळ कोल्हटकर यांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर, वॉर्ड क्रमांक 20, गडचिरोली.
मोबा. नं- ७७७५०४१०८६.
0 टिप्पण्या