🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नागरिकांना केले आवाहन🌟 


परभणी (दि.03 सप्टेंबर 2024) : यावर्षी जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. तरी जिल्हावासीयांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दोन्ही सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

दोन्ही सणानिमित्त जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत श्री. गावडे बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकारी गावडे म्हणाले की, येणाऱ्या काळातील गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत. तसेच त्यांनी मनपा आयुक्तांना शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करुन मनपाला रस्त्यांची व पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या आणि महावितरणला मिरवणूक मार्गातील डि.पी.ची पाहणी करुन उपाययोजना करण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समाज माध्यमांवर कोणाची ही भावना दुखविणा-या संदेशाची देवाण-घेवाण करु नये. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सर्व नागरिकांनी उत्साहात सण साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावर्षी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण साजरे करताना नागरिकांनी उत्साहाच्या भरात कुठल्याही प्रकारची जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले. तसेच उत्सवाच्या कालावधीत डिजे किंवा इतर संगीताने ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी आपल्या मंडळात कुठलेही गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मंडळातील गणेश भक्तांनी देखील अतिउत्साहात आपल्या हातून गैरकृत्य होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी गैरकृत्य किंवा घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी. अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीसांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. यावर्षीचे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत व उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस, महसूल आणि नगर प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी तयार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सण साजरा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण साजरा करण्याकरीता मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील रस्त्यांची व पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली.यावेळी बैठकीत शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, धर्मगुरुंनी देखील आपल्या सूचना प्रशासनासमोर मांडल्या. बैठकीस विविध विभागाचे विभाग प्रमुख, गणेश मंडळाचे पदाधिकारी, धर्मगुरू यांची उपस्थिती होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या