🌟या मेळाव्यात पुणे येथील संरक्षण विभागाच्या लेखा कार्यालयाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार🌟
परभणी (दि.23 सप्टेंबर 2024) : परभणी जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता व सर्व वयोवृध्द सैनिकांसाठी 97 आर्टीलरी ब्रिगेड येथील ‘सर्वत्रा ऑडीटोरीयम’ छावणी, छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार (दि.27) रोजी सकाळी 9 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेन्शन, स्पर्श आणि वन रँक वन पेन्शनसंबंधी येत असलेल्या अडचणींचे निरसन करण्यासाठी पुणे येथील संरक्षण विभागाच्या लेखा कार्यालयाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
या विषयाशी संबंधित अडचणी असल्यास त्यांनी या मेळाव्याला जाताना सर्व मूळ कागदपत्रे व अडचणीसंबंधी वैयक्तिक अर्ज हिंदी अथवा इंग्रजीमध्ये तीन प्रतीत सोबत असावेत. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना लिहिण्या-वाचण्यासंबंधी अडचण असल्यास त्यांनी त्यांच्या कुटुंबातील योग्य व्यक्तीस सोबत घेवून जावे. या मेळाव्यास जाणाऱ्या जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांकरिता मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक व रेल्वेस्टेशन ते 97 आर्टीलरी ब्रिगेड “सर्वत्रा ऑडीटोरियम" छावणी छत्रपती संभाजीनगर पर्यंत सैनिक परिवाहनाची तसेच चहापान व दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
या मेळाव्यास सर्व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, वीरपत्नी, वीर पिता, वीर माता व सर्व सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 0240-2370313 वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असेही सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे........
******
0 टिप्पण्या