🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीत 'जन्मभूमी सेवा प्रतिष्ठानने राबविला अनोखा उपक्रम'......!

🌟वटवृक्षांच्या रूपाने वडिलांच्या आठवणी जपण्याचा मानस यावेळी विजय कोमटवार यांनी बोलून दाखविला🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील जन्मभूमी सेवा प्रतिष्ठान तर्फे गावात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिष्ठानने अशाच प्रकारचा एक अनोखा उपक्रम राबविला आहे. जन्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय कोमटवार अवर सचिव, विधान भवन सचिवालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे वडील कैलासवासी शंकरराव भुजंगराव कोमटवार यांच्या स्मृती पित्यर्थ अनावश्यक खर्च टाळून दोन वट वृक्षांची लागवड धनगर टाकळी येथील स्मशानभूमी परिसरात करण्यात आली. विजय कोमटवार यांच्या वडिलांच्या अस्थीची राख त्या वटवृक्षांच्या बुडाला टाकण्यात आली. वटवृक्षांच्या रूपाने वडिलांच्या आठवणी जपण्याचा मानस यावेळी विजय कोमटवार यांनी बोलून दाखविला.

 या अगोदरही जन्मभूमी सेवा प्रतिष्ठानने अशा प्रकारचा उपक्रम अनेक वेळा राबवून वृक्ष लागवड केली आहे. याशिवाय गावात गोदावरी नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतवर्य दाजीमहाराज यांच्या काळातील 100 वर्षाहून अधिक जुना  लिंबारा होता. पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला. हा उध्वस्त झालेला लिंबारा पुन्हा एकदा नव्याने निर्माण करण्याचा चंग जन्मभूमी प्रतिष्ठानने बांधला आहे. वृक्षतोड झालेल्या लिंबाऱ्यात सध्या जंगली गवत व काटेरी बाभळीची झुडुपे वाढली होती. ती अनावश्यक झाडे झुडपे साफ करून तिथे देशी जातीची विशेषतः लिंबाची झाडे लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जन्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोमटवार, सचिव मारोती शेरकर, गावचे सरपंच सैनाजी माठे, उपसरपंच मगदूम साहेब, ग्रामविकास अधिकारी रमेश घिरडकर साहेब,तंटामुक्ती अध्यक्ष गोरखनाथ साखरे तसेच बळीराम साखरे, मुंजाजी कोमटवार, बालाजी उकंडे (पत्रकार), माधवराव कोमटवार, गणेशराव रोडगे, शेख सत्तार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या