🌟हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे🌟
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असून शिवा भूत्वा शिवां यजेत् या भावनेने हरितालिकेची पूजा करावी, असे सांगितले जाते. हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा शुक्रवार दि.६ सप्टेंबर २०२४ रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. जाणून घेऊया व्रताचे महत्व आणि नियम. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा प्रस्तुत लेख अभ्यासा.... संपादक.
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.
"शिवा भूत्वा शिवां यजेत् |"
या भावनेने हरितालिकेची पूजा केली जाते. पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन तिने शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे.
शिव-पार्वती किंवा महेश्वर-उमा ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे, म्हणून आपण या तत्त्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे, म्हणून प्रार्थना करायची असते. वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. संकल्प, सोळा उपचार पूजन, सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य, आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते. व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात. दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात. उत्तर भारतात महिला हे व्रत करतात. तसेच काशी प्रांतातही हे व्रत केले जाते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किनारपट्टी, गोवा राज्यातही हे व्रत केले जाते. भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात.
हिंदू धर्मात व्रत- वैकल्यांना अधिक महत्त्व आहे. भाद्रपद महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागते ते गणपतीचे. गणपतीच्या एक दिवसापूर्वी महिलावर्गाकडून हरतालिका तृतीयेचे व्रत केले जाते. हरतालिका तृतीयेच व्रत हे प्रत्येक महिलेसाठी खास असते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते. शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत केल्याने इच्छुकांचे लग्न ठरते तर इच्छित वर प्राप्ती होते असे म्हटले जाते. ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न जमत नसेल तर लग्नाआधी कुमारीका हरतालीकेचे व्रत करतात. जर तुम्ही देखील पहिल्यांदा हरतालिकाचे व्रत करत असाल तर जाणून घेऊया योग्य तिथी, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व.
* हरतालिका तृतीया तिथी :-
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीयेचे व्रत केले जाते. यंदा हरतालिका तिथी ही ६ सप्टेंबरला असणार आहे. हा सण महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यातही केला जातो. प्रत्येक ठिकाणी या दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. तसेच या दिवशी शिव-पार्वतीची पूजा केली जाते. हरतालिका तृतीया शुभ मुहूर्त पंचांगानुसार दि.५ सप्टेंबर २०२४ला दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी आहे. त्यानंतर तृतीया तिथी सुरु होईल. दि.६ सप्टेंबर २०२४ला दुपारी ३ वाजून १ मिनिटांपर्यंत तृतीया तिथी समाप्त होऊन चतुर्थी तिथी असेल. परंतु, उदयतिथीनुसार हरतालिका तृतीया ही दि.६ सप्टेंबर २०२४ला असणार आहे. हरतालिका तृतीयेच्या दिवशी रवि योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी रवि योग तयार होईल तर दि.७ सप्टेंबर २०२४ला सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी संपेल. यादिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा शुभ संयोग देखील असणार आहे.
!! समस्त भगिनींना हरितालिका तीज व्रतानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!
- संकलन व सुलेखन -
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
एकता चौक, रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.
0 टिप्पण्या