🌟मराठवाडा मुक्ती संग्राम दिन समारंभाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून आढावा...!


🌟यावेळी जिल्हा यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या🌟

परभणी (दि.09 सप्टेंबर 2024) : मराठवाडा मुक्ती संग्रामदिन समारंभाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेत जिल्हा यंत्रणेच्या संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या.  


यावेळी महानगर पालिका आयुक्त धैर्यशील जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मंगळवार, (दि. 17)  रोजी साजरा करण्यात येणार आहे. राजगोपालचारी उद्यानात स्मृती स्तंभाजवळ पार पडणाऱ्या मुख्य शासकीय समारंभासाठी करावयाच्या तयारीसंबंधी सर्व विभागप्रमुखांनी चोख जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या.    

यावेळी प्रमुख अतिथींच्या  हस्ते  सकाळी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण व मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच सकाळी 9 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न होणार आहे. या मुख्य शासकीय समारंभास सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे. तसेच जास्तीत-जास्त नागरिकांना या समारंभासाठी उपस्थित राहता यावे, यासाठी वरील कालावधीत ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा यंत्रणेच्या महानगरपालीका, पोलीस अधीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय, महावितरण, शिक्षणाधिकारी (मा/प्रा) या कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या