🌟शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी, पिकांच्या नुकसानीसाठी संपूर्ण मदत देण्यास सरकार कटीबद्ध - कृषीमंत्री धनंजय मुंडे


🌟कृषिमंत्री मुंडे यांच्याकडून परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ; तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश*

🌟शेतकऱ्यांशी संवाद साधत मुंडेंनी दिला धीर; जिल्ह्यातील थकीत पिकविम्या बाबतही प्रशासनास निर्देश🌟


परभणी (दि.04 सप्टेंबर 2024) :- मराठवाड्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यांमध्ये नुकसान झालेल्या स्थळी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 


राज्य सरकार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये, झालेल्या नुकसानीचा पूर्णपणे मोबदला मदतीच्या स्वरूपात राज्य शासनाकडून मिळेल, असा शब्द यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला. पावसाच्या अतिप्रवाहाने तसेच नदीतील प्रवाहाचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी मधील माती पूर्णपणे खरडून गेली आहे त्याही ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत दिली जाईल असेही आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले. 


दरम्यान धनंजय मुंडे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आदींना तात्काळ पंचनामे सुरू करून मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे शक्य तितक्या लवकर पाठवावेत असे निर्देश दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी आजच्या दौऱ्यात परभणी जिल्ह्यातल्या मानवत, पाथरी, सेलू तालुक्यातील एकुरका, पिंपळगाव, बोरगव्हान, कोष्टगाव, कोल्हा, ढेंगली पिंपळगाव, रेणापूर आदी गावांमध्ये भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली, यावेळी आ.मेघनाताई बोर्डीकर, आ.राजेशदादा विटेकर, मा.आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, मिथिलेश केंद्रे, अनिल नखाते, भावनाताई नखाते यांसह महसूल, कृषी व विमा कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी परभणी जिल्ह्यातील थकित पीक विम्याचेही तातडीने वितरण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या