🌟परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याचा शास्त्रज्ञांनी घेतला आढावा....!


🌟या आढावा बैठकीमध्ये कृषि विज्ञान केंद्र परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.प्रशांत भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली मार्फत संपुर्ण देशामध्ये कार्यरत असणाऱ्या 731 कृषि विज्ञान केंद्रांच्या विस्तार विषयक व इतर कार्यक्रमांचा आढावा घेतला जात आहे त्या अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्र परभणी मार्फत परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेण्यासाठी दि. 29/08/2024 रोजी  केंद्रीय कापुस संशोधन केंद्र, नागपुर येथील डॉ. निळकंठ हिरंमणी व डॉ. मनिकंदन ए. या शास्त्रज्ञांनी कृषि विज्ञान केंद्र, परभणी व कृषि विज्ञान केंद्रामार्फत प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात आलेल्या गावांना भेटी दिल्या.

या आढावा बैठकीमध्ये कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या मागील तीन वर्षाचा विविध कृषि विस्तार कार्यक्रम, शेतकरी कल्याण कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र, परभणी मार्फत् राबविण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिक कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या जिवनशैलीत कशा प्रकारे बदल घडुन आला याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील बिजोत्पादन कार्यक्रम व विविध प्रात्यक्षिक प्रकल्प जसे की रोपवाटिका, पोषणबाग, पिक संग्रहालय, माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा,  ट्रायकोकार्ड निर्मिती प्रकल्प, भरडधान्य प्रक्रिया उद्योग, ॲझोला युनिट, शेळीपालन व कुक्कुटपालन प्रकल्प, गाडुळखत निर्मिती प्रकल्प यांस भेट दिली.

तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत मौजे. मंगरुळ ता. मानवत व वडगाव सुक्रे ता. परभणी येथे राबविण्यात आलेल्या पिक प्रक्षेत्र चाचणी, आद्यरेषा पिक प्रात्यक्षिके व कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार उभररण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिक प्रकल्पांना भेट दिली. मौजे. मंगरुळ ता. मानवत येथे असलेल्या संरक्षित शेती अंतर्गत विकसीत केलेल्या एकात्मिक शेती पध्दती मॉडेल बाबत शास्त्रज्ञांनी समाधान व्यक्त केले. तसेच अश्या प्रकारचे उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी राबविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. 

मौजे. वडगाव सुक्रे ता. परभणी येथे कृषि विज्ञान केंद्र, परभणी मार्फत स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी व या कंपनी मार्फत सुरु करण्यार आलेले कृषि सेवा केंद्र शेतकऱ्यांना कश्या प्रकारे पुरक सेवा पुरविते याबाबत शास्त्रज्ञांनी या कंपनीमध्ये  कार्यरत असणाऱ्या सर्व युवकांचे कौतुक केले. तसेच शेतीमध्ये ग्रामीण युवकांचा सहभाग हा शेतीक्षेत्रासाठी अतिशय आशादायक आहे, असे मत व्यक्त केले.

सदरील कार्यक्राच्या अंतिम टप्यामध्ये परभणी येथील पारदेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीच्या  रीटेल आऊटलेटला भेट देण्यात आली. त्यासमयी प्रगतशील शेतकरी श्री. जनार्धन आवरगंड, श्री. रामेश्वर साबळे व श्री. प्रकाश हारकळ यांनी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने अशा प्रकारे विक्री व्यवस्था उभारणी केल्याचे नमुद केले. तसेच या बाबीमध्ये कृषि विज्ञान केंद्र, परभणी मार्फत योग्य प्रकारे तात्रिक सहाय्य मिळत असल्याने सर्वांचे आभार व्यक्त केले. कंपनीच्या सर्व सभासदांमार्फत सर्व शास्त्रज्ञांचा विशेष सत्कार करण्यात आला.      

सदरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतांना डॉ. निळकंठ हिरंमणी व डॉ. मनिकंदन ए. या शास्त्रज्ञांनी कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा, उच्च प्रतिचे बियाणे उपलब्ध करुन द्यावे व शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यामध्ये हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या