🌟परभणी जिल्ह्यात विशेष मोहिमेत १.७० लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट....!


🌟जिल्ह्यात शनिवारपासून ‘ई पीक पाहणी’ची विशेष मोहीम🌟 

परभणी (दि.19 सप्टेंबर 2024) : राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात सन 2021 पासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, या पिकांची नोंदणी करण्यासाठी ई पीक पाहणी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. ही विशेष मोहीम शनिवारपासून तीन दिवस राबविण्यात येणार असून, या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 69 हजार 600 शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यात एकूण 848 गावे असून, प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी पूर्ण केल्यास 1 लक्ष 69 हजार 600 पर्यंत उद्दिष्ट या मोहिमेदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व संबंधित उपविभागीय अधिकारी हे याबाबतचे सूक्ष्म नियोजन करून ही विशेष मोहिम राबविणार आहेत या विशेष मोहिमेत पीक पेरणीची माहिती स्वतः शेतक-यांनी मोबाईल अॅप‌द्वारे गाव नमुना नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. तथापि खरीप हंगामातील 8 सप्टेंबर 2024 अखेर 62.70 टक्के क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे  12 व 13 सप्टेंबर 2024 रोजी अशीच विशेष मोहिम राबविण्यात आली होती. तथापि दोन दिवसाची विशेष मोहिम राबवून देखील खरीप हंगाम 2024 मध्ये बुधवारपर्यंत (दि.18) अखेर 72.10 टक्केच ई-पीक पाहणी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

त्यानुषंगाने ई-पीक पाहणी मोबाईल अॅप्लिकेशनची माहिती व जनजागृती सर्व शेतक-यांना व्हावी व त्यांच्या शेतातील पिकांची माहिती त्यांनी स्वतः गाव नमुना नंबर 7/12 वर नोंदविण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी  ही मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासन व कृषि विभागाने निश्चित केले आहे. त्यानुषंगाने प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार यांनी गावाचे समप्रमाणात विभाजन करून 50 टक्के गावे तहसिल कार्यालयामार्फत व उर्वरीत 50 टक्के गावांमध्ये तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून उदिष्टपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याद्वारे उदिष्टपूर्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. 

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगारसेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशिल शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महावि‌द्यालयातील विद्यार्थी (असल्यास) तसेच तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकाची निवड करुन त्यांच्या सहाय्याने शेतक-यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करमन पीकपेरा भरुन घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी केल्या आहेत..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या