🌟बाधित भागाचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश🌟
परभणी (दि.०२ सप्टेंबर २०२४) :- परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या ग्रामीण आणि शहरातील भागाची आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
यावेळी तहसीलदार संदीप राजपुरे, माधव बोथीकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी आज पुर्णा तालुक्यातील ताडकळस व चुडावा आणि परभणी शहरातील जमजम कॉलनी आणि बरकत पुरा येथील पिंगळगड नालाचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे शेख जाकीर शेख गुलाम याच्या घराची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याबाबत सांगितले.
श्री.गावडे यांनी महावितरण आणि मनपा अतिरिक्त आयुक्त यांना याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.तसेच पुर्णा तालुक्यातील ताडकळस, चुडावा येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली व जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या भागांचे तातडाने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित तलाठी मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांना दिलेत. यावेळी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.....
*****
0 टिप्पण्या