🌟नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिन सप्रयोग उघडे पाडले ; अनेक भोंदू बाबांचे पितळ.....!


🌟नरेंद्रजींचे वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होत🌟

नरेंद्र अच्युतराव दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स.१९८९ साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वतः या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवार दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्वर पूलावर अज्ञातांनी चार गोळ्या झाडून हत्या केली. असा उद्बोधक लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा शब्दांत जरूर वाचा... संपादक.

        नरेंद्रजींचे वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी दि.१ नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै.डॉ.देवदत्त दाभोलकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. दाभोलकरानी शैला यांच्याबरोबर विवाह केला. त्याना मुक्ता आणि हमीद ही दोन अपत्ये आहेत. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले. लग्न सोहळा व त्या मधील खर्च यावर ते सतत टीका करीत. आपल्या दोन्ही मुलांचे विवाह साध्या पद्धतीने केले. नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स.१९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

       बाबा आढाव यांच्या एक गाव- एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स.१९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स.१९८९मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर १९९८पासून मृत्यूपर्यंत संपादक होते. त्यांची साहित्य संपदा- १) अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम: राजहंस प्रकाशन २) अंधश्रद्धा विनाशाय: राजहंस प्रकाशन ३) ऐसे कैसे झाले भोंदू?: मनोविकास प्रकाशन ४) ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक- लेखक: अभिराम भडकमकर). या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. ५) झपाटले ते जाणतेपण: संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ. ६) ठरलं... डोळस व्हायचंच: मनोविकास प्रकाशन, ७) तिमिरातुनी तेजाकडे: राजहंस प्रकाशन, ८) दाभोलकरांच्या दहा भाषणांची सीडी. ९) प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे: डीव्हीडी, निर्माते - मॅग्नम ओपस कंपनी. १०) प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर): राजहंस प्रकाशन ११) भ्रम आणि निरास: राजहंस प्रकाशन, १२) मती भानामती- राजहंस प्रकाशन (सहलेखक माधव बावगे) १३) विचार तर कराल?: राजहंस प्रकाशन, १४) विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी- दिलीपराज प्रकाशन, १५) श्रद्धा-अंधश्रद्धा- राजहंस प्रकाशन (इ.स. २००२) अशी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.

          "मला माझ्याच देशात पोलीस स्वतःच्या लोकांकडून संरक्षण घ्यायचे असेल तर मला काहीतरी चुकीचे वाटते, मी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत लढा देत आहे आणि हे कोणाविरुद्ध नाही तर सर्वांसाठी आहे." - पोलीस संरक्षण नाकारण्यावर दाभोलकर. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर- प्रचलित नाव असणाऱ्या ओंकारेश्वर पूलावर अज्ञातांनी चार गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत.

          अशातच मंगळवार दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर दाभोलकर शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे ते घटनास्थळीच कोसळले. गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवारपेठच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले. छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले.

!! स्मृतिदिनी दाभोळकरांना व त्यांच्या जनहीतैषी कार्यांना शतशः सॅल्युट !!

                श्री कृष्णकुमार  आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी,

            (थोर पुरुषांच्या प्रेरक जीवनचरित्रांचे गाढे अभ्यासक)

                गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या