🌟परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली माहिती🌟
महाराष्ट्र राज्यात यंदा विधानसभा निवडणुक होणार आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हयात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे.
निवडणुका खुल्या आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम ०६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबवला गेला. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीत ३३,०२३ मतदारांची नव्याने नाव नोंदणी झाली. तसेच ५,०३३ मतदारांची वगळणी करण्यात आली. तसेच स्थलांतराने ९७५ इतके मतदार जिल्ह्यात समाविष्ठ झाल्याने अंतिम मतदार यादीमध्ये २८,१४६ मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या १५,३२,३०७ इतकी झालेली आहे. त्यानुसार १०,६१६ पुरुष मतदारांची १७,५३० स्त्री मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९२८ वरून ९३६ इतके झाले आहे. जे की लोकसंख्येच्या गुणोत्तर प्रमाणएवढे आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये ८,९८६ मतदारांची नव्याने भर पडली आहे तसेच २० ते २९ या वयोगटात १५,०१४ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ वयोगटाची मतदार संख्या २४,५०८ (१.५५ टक्के) होती, ती अंतिम मतदार यादीमध्ये ३३,४९४ (२.११ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मत संख्या ३,३१,३४० (२०.९० टक्के) होती, ती अंतिम यादीत ३,४६, ३५४ (२१.८५ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था तसेच महाविद्यालयामध्ये एकुण ५३ मतदार नोंदणी कॅम्प घेवून राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमध्ये या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी २५ जुन २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार प्रारूप व अंतिम मतदार यादी प्रसिध्दपर्यंत २,१०४ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली.ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.
यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली. पूर्व-नोंदणीचे एकूण १०,२७४ अर्ज (१ जानेवारी-३५७५, १ एप्रिल २२६५, १ जुलै-२८४६, १ ऑक्टोबर-१५८८) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यावत (Continuous Updation) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.
दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी 'मतदाता सेवा पोर्टल' या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन वेळी मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नमुना-६ अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (BLA) नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच 'मतदाता सेवा पोर्टल' आणि 'वोटर हेल्पलाइन ॲप' यांवर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.....
0 टिप्पण्या